अमित शहा आता घेणार अटलजींची जागा

अमित शहा आता  घेणार अटलजींची जागा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपला दणदणीत विजय मिळवून देणारे रणनीतिकार, भाजपाध्यक्ष व नवे गृहमंत्री अमित शहा यांचा पत्ता आता बदलणार असून, आता ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या "6-ए कृष्ण मेनन मार्ग' या निवासस्थानी राहण्यासाठी जाणार आहेत. अतिशय शांत ठिकाणी असलेल्या या प्रशस्त बंगल्याच्या समोरचा बंगला भारताच्या सरन्यायाधीशांना दिला जातो. 

अटलबिहारी वाजपेयी यांचे गेल्या वर्षी 16 ऑगस्टला दीर्घ आजारानंतर 6- कृष्ण मेनन मार्ग, येथेच निधन झाले. तोच बंगला आता शहा यांना देण्यात आला आहे. गृहमंत्री सध्या 11 अकबर रस्ता येथे रहात आहेत. लवकरच ते नवीन घरात जातील. 

दिल्लीत राष्ट्रपती किंवा एखाद्या लोकमान्य नेत्याच्या निवासस्थानी त्यांच्या निधनानंतर स्मारक बनविण्याची परंपरा नरेंद्र मोदी यांनी तोडली. नेहरू- गांधी कुटुंबीय वगळता यातील अनेकांच्या स्मारकांचा ताबा संबंधितांच्या नातेवाइकांकडेच जातो असा पूर्वानुभव आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे राजाजी निवासस्थान नंतर केंद्रीय मंत्र्यांसाठी दिले गेले, त्याच धर्तीवर अटलजींच्या निवासस्थानीही त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक न बनविता ते इतरांना राहण्यासाठी उपलब्ध करून अटलजींचे स्मारक राजघाटावरील "सदैव अटल' या समाधिस्थळी करण्याचे औचित्य मोदींनी दाखविले. अटलजींच्या मानसकन्या व कुटुंबीयांनी त्यांच्या निधनानंतर या बंगल्याचा ताबा त्वरित सोडला. त्यानंतर हा बंगला आता शहा यांना देण्याचा निर्णय नगरविकास विभागाच्या समितीने घेतला आहे.

मोदी यांना 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या भरघोस विजयाचे शिल्पकार म्हणून शहा यांची ओळख बनली आहे. त्यांच्या रणनीतीमुळेच भाजपला 542 पैकी तब्बल 303 जागांवर विजय मिळाल्याचे भाजप मानतो. त्यानंतर मोदींनी शहा यांना मंत्रिमंडळात घेऊन क्रमांक दोनचे गृहमंत्रिपद दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com