अधिवेशनात जास्तीत जास्त हजेरी लावा : शहा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 जुलै 2019

संसद अधिवेशनाचा कालावधी सात ऑगस्टपर्यंत सरकारने वाढवल्यावर आता दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांची उपस्थितीही असावी यासाठी सत्तारूढ नेतृत्व सातत्याने खासदारांना सल्ला देत आहे.

नवी दिल्ली : संसद अधिवेशनाच्या वाढवलेल्या कालावधीत सत्तारूढ भाजप खासदारांनी जास्तीत जास्त वेळ आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे असे पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांनी आज स्वपक्षीय खासदारांना बजावले.

संसद अधिवेशनाचा कालावधी सात ऑगस्टपर्यंत सरकारने वाढवल्यावर आता दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांची उपस्थितीही असावी यासाठी सत्तारूढ नेतृत्व सातत्याने खासदारांना सल्ला देत आहे. याच मुद्द्यावर पंतप्रधानांनीही खासदारांचे कान टोचले होते मात्र तरीही अखेरच्या टप्प्यात शहा यांना तोच इशारा द्यावासा वाटणे हे लक्षणीय मानले जात आहे.

भाजप संसदीय पक्षाची बैठक आज सकाळी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, शहा यांनी लोकसभेत झालेल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग विधेयकाचे उदाहरण दिले. या विधेयकाच्या बाजूने 260 आणि विरोधात 48 अशा मतांनी ते विधेयक मंजूर झाले. मतांचा हा फरक आणखी मोठा पाहिजे होता शहा यांनी सूचकपणे सांगितल्याची माहिती आहे.

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, अधिवेशनात आतापर्यंत 15 विधेयके मंजूर झाली आहेत यातील सहा विधेयके लोकसभेत आणि चार विधेयके राज्यसभेत मंजूर झाली आहेत आणि ती दुसऱ्या सभागृहांमध्ये मंजूर होणे बाकी आहे याशिवाय आणखी 11 विधेयके मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत असेही जोशी म्हणाले.

खासदारांसाठी कार्यशाळा
मंत्री आणि खासदार त्यातही नव्याने निवडून आलेले खासदार यांना संसदेचे नियम प्रथा आणि परंपरा यांची माहिती पुन्हा व्हावी यासाठी आणि 4 ऑगस्टला खासदारांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. याला उपस्थित राहणे खासदारांना आवश्यक आहे. भाजप वर्तुळात याला "खासदारांचा अभ्यास वर्ग' असेही संबोधले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah order to all MP to attend sessions at Loksabha