वर्षपूर्तीत 70 वर्षांचे पालुपद!; शहांकडून मोदींचे गुणवर्णन

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : 'गेल्या 70 वर्षांत जे झाले नाही,' हे पालुपद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेले निर्णायक नेतृत्व, अस्थिरतेची समाप्ती, गरिबांना समर्पित सरकार व जगात देश-गौरववृद्धी, भ्रष्टाचारविहीन सरकार अशा वैशिष्ट्यपूर्ण भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचे गुणवर्णन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले. इंदिरा गांधी यांच्याच धर्तीवर बोलताना त्यांनी देशातील अव्यवस्था, भ्रष्टाचार व गरिबी हटविणे ही मोदींची उद्दिष्टे आहेत; परंतु विरोधी पक्ष मोदींनाच हटवू पाहात आहेत असे सांगितले. 

सरकारला आज चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त भाजपच्या मुख्य कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शहा यांनी असंख्य आकडेवारी देऊन मोदी सरकारच्या यशस्वी कारकिर्दीचे तपशील दिले. 2014 मध्ये देशातली तीस वर्षांची अस्थिरता संपवून स्वबळाच्या बहुमतावर नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन केले. आपले सरकार देशातल्या मागासवर्गीय, आदिवासी, गरीब व शेतकऱ्यांना समर्पित असेल आणि जगात देशाचा गौरव वाढविण्याचे आश्‍वासन मोदींनी त्या वेळी दिले होते आणि चार वर्षांत त्यांनी त्यावर अंमलबजावणी करून दाखवली, असा दावा त्यांनी केला. 

सरकारच्या वैशिष्ट्यांचा उल्लेखही शहा यांनी केला. पूर्वीच्या सरकारांमध्ये विकास व प्रगतीसाठी कशाला अग्रक्रम द्यावयाचा याबाबत गोंधळ असायचा; पण मोदींनी तो दूर केला आणि गाव व शहरे, शेती व उद्योग, आर्थिक शिस्त आणि कल्याणकारी कार्यक्रम या सर्वांमध्ये समतोल साधला असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की घराणेशाही, तुष्टीकरण किंवा अनुनयाचे आणि जातीय राजकारण मोदींनी नष्ट केले. माध्यमांमध्ये गैरव्यवहाराचे मथळे दूर होऊन विकास व प्रगतीचे मथळे दिसू लागले व धोरणात्मक अपंगत्व दूर झाले. 

त्यांच्या निवेदनानंतर झालेल्या प्रश्‍नोत्तरांत त्यांनी राजकीय विरोधकांवर टीकास्त्र सोडले. 'गेल्या वर्षापासून खोटे बोलण्याची आणि ठासून खोटे बोलण्याची गोष्ट दिसून येऊ लागली आहे. घराणेशाही करणारे लोकशाहीची भाषा करू लागले, तर आणीबाणी लागू करणाऱ्यांना देशात भीतीचे वातावरण असल्याचे आढळून येऊ लागले. ज्यांनी माध्यमांची गळचेपी केली ते आता माध्यमांच्या मुस्कटदाबीचा आरोप करू लागले आहेत,' अशा शब्दांत त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. 

रोजगाराचा संक्षिप्त उल्लेख 
रोजगारासारख्या संवेदनशील मुद्द्यावर मात्र शहा यांनी फारशी आकडेवारी न देता त्याचा केवळ संक्षिप्त उल्लेख केला. 'मुद्रा'सारख्या प्रयोगातून नऊ कोटी व्यक्तींना स्वरोजगारप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला, तसेच स्टार्ट अप, स्टॅंड अप इंडियासारख्या योजनांद्वारेही रोजगारनिर्मिती करण्यात आल्याचा केवळ उल्लेख त्यांनी केला. सर्जिकल स्ट्राइकच्या मालिकेतच त्यांनी नोटाबंदी व जीएसटी करप्रणाली लागू करण्याच्या निर्णयांचा उल्लेख केला. 

शहा उवाच... 

  • अनुसूचित जाती-जमाती कायदा रद्द करणार नाही, दलितांवरील अत्याचार वाढलेले नाहीत. 
  • पाकिस्तानविरुद्ध युद्ध हा शेवटचा पर्याय असेल; परंतु सरकार दहशतवाद्यांच्या विरोधात परिणामकारक पावले उचलत आहे. 
  • पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे व लवकरच मार्ग निघेल. 
  • शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीत पन्नास टक्के वाढ करून भाव देण्यास खरीप हंगामापासूनच सुरवात करण्यात येईल. 
  • राम मंदिराचा मुद्दा कोर्टाच्या निकालाद्वारे किंवा आपसातील चर्चेने सोडविण्याची भाजपची भूमिका आजही कायम आहे. 

शिवसेना बरोबरच राहावी 
शिवसेनेने भाजपबरोबर आगामी निवडणुका लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत विचारणा केली असता शहा म्हणाले, ''शिवसेना आमच्याबरोबरच राहावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. भाजप व शिवसेना यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात अशी आमची भूमिका आहे. आम्हाला आशा आहे. आजही ते आमच्याबरोबर केंद्रात व राज्यातही सरकारमध्ये सहभागी आहेत; पण ते निवडणूक आमच्याबरोबर लढवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल त्यांनाच विचारा.'' 

राहुल यांची दखल नाही 
कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यास पंतप्रधान होण्याबाबत राहुल गांधी यांनी तयारी दाखविली असल्याच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शहा म्हणाले, ''राहुल गांधी यांच्या या निवेदनाची दखल त्यांच्या पक्षातही फारशी घेण्यात आलेली नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव या नेत्यांनीही त्यावर मतप्रदर्शन किंवा समर्थन केलेले नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com