पक्षशिस्त मोडल्यास कडक कारवाई; भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांना अमित शहांचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

पक्षाच्या ध्येयधोरण शिस्तीच्या चौकटीबाहेर जाऊन वक्तव्ये केली तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी खासदार वरुण गांधी व सुब्रह्मण्यम स्वामी यांना दिला आहे.

नवी दिल्ली- पक्षाच्या ध्येयधोरण शिस्तीच्या चौकटीबाहेर जाऊन वक्तव्ये केली तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी खासदार वरुण गांधी व सुब्रह्मण्यम स्वामी यांना दिला आहे. या दोघांना "समजावून' सांगण्याची जबाबदारी एका ज्येष्ठ मंत्र्यांना दिल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. 

"बोलघेवडेपणा करू नका,' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार दिला असतानाही त्याचा परिणाम होत नसल्याचे पाहून भाजप नेतृत्वाने आता वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या खासदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केल्याचे दिसते. आगामी काळात खासदार, आमदार व इतर नेते या टप्प्याने ही कारवाई जारी राहील, असेही भाजप सूत्रांनी सांगितले. 

संसदेत नुकत्याच झालेल्या भाजप खासदारांच्या साप्ताहिक बैठकांत मोदी यांनी, "माध्यमांसमोर जाऊन वादग्रस्त विधाने करू नका,' असे खासदारांना वारंवार व वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले होते. भाजपमध्ये साक्षी महाराज, निरंजना ज्योती, सुब्रह्मण्यम स्वामी आदी खासदार वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्ये करण्याबद्दल "प्रसिद्ध' आहेत. उत्तर प्रदेशाच्या निकालानंतर स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना, आता राममंदिर बनण्यातील अडथळे दूर झाले आहेत असे सांगितले होते. आता कोणा पक्षाने राम मंदिराला विरोध केला, तर 2019 मध्ये त्या पक्षाच्या खासदारांची संख्या चारवर येईल, असेही ते म्हणाले होते. वरुण गांधी यांनी तर रोहित वेमुलापासून शेतकरी आत्महत्यांपर्यंत वादग्रस्त विधाने केली होती. शेतकऱ्यांना छोट्या रकमेच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागते; पण मोठे उद्योगपती हजारो कोटींची कर्जे बुडवून परदेशात पळून जातात, असे त्यांनी इंदूर येथे म्हटले होते. 

शहा यांनी याची गंभीर दखल घेत या दोघांना इशारा दिला आहे. पक्षाच्या धोरण शिस्तीच्या बाहेर जाऊन वक्तव्ये कराल तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही दोघांना कळविण्यात आले आहे. स्वामी हे अशा इशाऱ्यांना कितपत जुमानतील, या प्रश्‍नावर सूत्रांनी, त्यांना ऐकावेच लागेल अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे तीव्रपणे नमूद केले. मंत्रिपद न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगितले जाते. मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचाही अपवाद मोदी यांनी केलेला नाही, असेही सूत्रांनी नमूद केले. घरात एकच मंत्रिपद, हे धोरण मोदींनी निश्‍चित केले आहे व त्याबाहेर कोणीही नाही, असे पक्षनेतृत्वाने निश्‍चित केले आहे. 

भाजपचे वादग्रस्त नेते 
- साक्षी महाराज 
- निरंजना ज्योती 
- सुब्रह्मण्यम स्वामी 
- वरुण गांधी 

Web Title: Amit shaha warns party leader