esakal | ‘ॲम्लेक्स’ उपकरण वाचविणार ऑक्सिजन
sakal

बोलून बातमी शोधा

IIT Oxygen Equipment

‘ॲम्लेक्स’ उपकरण वाचविणार ऑक्सिजन

sakal_logo
By
पीटीआय

चंडीगड - देशभरात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा (Oxygen) प्रचंड तुटवडा (Shortage) जाणवला. अनेक ठिकाणी ऑक्सिजन वाया जाण्याचेही प्रकार घडले. पंजाबमधील आयआयआयटी, रोपरने रुग्णाच्या श्वाच्छोश्वासादरम्यान सिलिंडरमधून पुरविला जाणारा ऑक्सिजन नियंत्रित करणारे उपकरण विकसित केले आहे. हे अशा प्रकारचे पहिलेच उपकरण आहे. (Amlex Equipment will Save Oxygen)

हे उपकरण रुग्णाला श्वास घेताना आवश्यक ऑक्सिजन पुरविते तर श्वास सोडताना ऑक्सिजन पुरवठा तात्पुरता थांबविला जातो. त्यामुळे, श्वास सोडताच्या क्षणी ऑक्सिजन वाचविला जातो, असे आयआयटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ॲम्लेक्स नावाचे हे उपकरण विशेषतः ऑक्सिजन सिलिंडरसाठी विकसित करण्यात आले आहे.

हेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूच्या आकड्यांशी केंद्राचा संबंध नाही - आरोग्य मंत्रालय

आयआयटीमधील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.आशिष सहानी म्हणाले, की रुग्णाच्या श्वास घेण्याच्या व सोडण्याच्या प्रक्रियेनुसार सिलिंडरमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित केला जातो. त्यामुळे, सिलिंडरमधील ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर बचत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली होती. या उपकरणामुळे विनाकारण वाया जाणारा ऑक्सिजन वाचेल. हे उपकरण वीजेवर तसेच बॅटरीवरही वापरता येऊ शकते.

उपकरण कसे काम करते?

‘ॲम्लेक्स’ हे उपकरण ऑक्सिजन पुरवठा होणारा सिलिंडिर किंवा पाइप व रुग्णाच्या मास्कला सहजरित्या जोडता येते. या उपकरणात सेन्सरचा वापर केला असून सेन्सर रुग्णाच्या श्वासोच्छश्वासाचे निदान करतो. श्वास घेताना ऑक्सिजन पुरविला जातो तर सोडताना तात्पुरता थांबविला जातो. सध्याच्या प्रक्रियेमुळे रुग्णाने श्वास बाहेर सोडल्यावर बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडबरोबर सिलिंडरमधून पुरविला जाणारा ऑक्सिजन पुन्हा सिलिंडरमध्ये ढकलला जातो. दीर्घकाळ वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वाया जातो. त्याचप्रमाणे, श्वास घेणे व सोडण्यामधील वेळेतही रुग्णाच्या मास्कमधून ऑक्सिजन वाया जातो. ॲम्लेक्स या उपकरणामुळे ऑक्सिजनची बचत होईल.

loading image