कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल....

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

माझा रानूला (केतन) परत पाठवा. माझी विनंती आहे, की तू परत ये...

मेरठ : कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल असा मजकूरासह छायाचित्र कुटुंबाच्या व्हॉट्सऍपग्रुपवर अपलोड केला अन् झालेही तसेच. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग चकमकीत हुतात्मा झालेले मेजर केतन शर्मा यांच्याबाबतीत.

मेजर केतन शर्मा यांनी सोमवारी (ता. 17) सकाळी सातच्या सुमारास व्हॉट्सऍपवर एक छायाचित्र अपलोड केले होते. त्यावेळी त्यांनी कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल, असे वाक्य लिहीले होते. हे छायाचित्र शेअर केल्यानंतर काही तासातच अनंतनागमधील चकमकीत केतन शर्मा हुतात्मा झाले. मेजर केतन शर्मा यांचे चुलत बंधू अनिल शर्मा म्हणाले, 'केतन यांनी जेव्हा व्हॉट्सऍप मेसेज केला होता, तेव्हा त्यांच्या पत्नीने रिप्लाय केला होता. पण आम्हाला आशा होती की ते सुरक्षित परत येतील. मात्र, बराच वेळ त्यांचा काही रिप्लाय आला नाही. त्यांची पत्नी इरा मुलीसह माहेरी असताना, केतन शर्मा जखमी झाल्याची माहिती मिळाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सैन्याचे अधिकारी घरी आले आणि केतन शर्मा हुतात्मा झाल्याचे सांगितले.'

सोमवारी अचबालच्या बदौरा गावात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी 19 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असलेले केतन शर्मा हुतात्मा झाले. मूळचे मेरठचे असलेल्या 32 वर्षीय मेजर केतन शर्मा यांच्या कुटुंबात पत्नी इरा, चार वर्षांची मुलगी कायरा, आई-वडील आणि एक धाकटी बहिण मेघा आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केतन यांचे पार्थिव गावात पोहचल्यानंतर त्यांच्या आईने माझा वाघ कोठे आहे? असे म्हणून हंबरडा फोडल्यानंतर अनेकांना अश्रू आवरणे कठीन झाले होते. माझा रानूला (केतन) परत पाठवा. माझी विनंती आहे, की तू परत ये... असे उषा (केतन यांची आई) म्हणत होत्या. दरम्यान, केतन यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाडक्या जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमूदाय जमला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anantnag Encounter : Major Ketan Sharma last whatsapp message to his family