जगनमोहन यांनी विमानतळावरच एकाला केली 20 लाखांची मदत

वृत्तसंस्था
बुधवार, 5 जून 2019

आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी विमानतळावर मदत मागणाऱ्या एका व्यक्तीला 20 लाख रुपये दिले. ही व्यक्ती कॅन्सरच्या इलाजासाठी प्लेकार्ड घेऊन मदत मागत होती.

हैद्राबद: आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी विमानतळावर मदत मागणाऱ्या एका व्यक्तीला 20 लाख रुपये दिले. ही व्यक्ती कॅन्सरच्या इलाजासाठी प्लेकार्ड घेऊन मदत मागत होती. 15 वर्षांच्या नीरज नावाच्या व्यक्तीला कॅन्सर झाला असून नीरजवर इलाज करायचे असतील तर त्यासाठी 20 लाख रुपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगितले होते. नीरज यांच्या कुटुंबीयांकडे एवढे पैसे नव्हते. 

बराच संघर्ष करून नीरजचे आई वडील, भाऊ आणि मित्रांनी काही पत्रकं बनवली आणि नीरजच्या इलाजासाठी पैसे जमवणं सुरू केलं. तरीही पुरेसे पैसे जमले नाहीत. त्याचवेळी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी नीरजच्या वडिलांना विमानतळावर जाऊन मदतीचं आवाहन करण्याचा सल्ला दिला. एअरपोर्टवर मोठमोठे लोक येतजात असतात त्यामुळे तिथे मदत मागा असं त्यांनी त्यांना सांगितलं.

ही मात्रा लागू पडली. जेव्हा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी विमानतळावरून जात होते तेव्हा 25-30 लोकांना असे बॅनर घेऊन उभं असलेलं त्यांनी पाहिलं. त्यांनी लगेचच सरकारी खर्चातून नीरजचे उपचार करण्याचे आदेश दिले. याआधीही जगनमोहन रेड्डी यांनी वृद्ध व्यक्तींची पेन्शन वाढवण्याचे आदेश दिले होते. त्याचसोबत 4 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांची ग्राम सचिवालयात नियुक्ती करावी, अशीही योजना जगनमोहन रेड्डी यांनी आणली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andhra CM Jaganmohan Reddy stops convoy to help cancer patient, assures Rs 20 lakh help