तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचे बाथरूम बुलेटप्रूफ

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

के. चंद्रशेखर राव यांचा आज गृहप्रवेश; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त
हैदराबाद - 'झेड प्लस' सुरक्षा, शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांचा पहारा, भूसुरुंगरोधक मोटारी व तटबंदी किल्ल्यासारखे घर एवढी सुरक्षा असूनही तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नवीन निवासस्थानातील स्वच्छतागृहही "बुलेटप्रुफ' केले आहे.

के. चंद्रशेखर राव यांचा आज गृहप्रवेश; सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त
हैदराबाद - 'झेड प्लस' सुरक्षा, शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांचा पहारा, भूसुरुंगरोधक मोटारी व तटबंदी किल्ल्यासारखे घर एवढी सुरक्षा असूनही तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नवीन निवासस्थानातील स्वच्छतागृहही "बुलेटप्रुफ' केले आहे.

आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेल्या तेलंगण राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मान के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना मिळाला. त्यांच्यासाठी बेगमपेठ येथे भव्य मुख्यमंत्री निवास बांधण्यात आले आहे. हे घर म्हणजे एक लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारलेला राजवाडाच आहे. येथील खिडक्‍यांचा व अन्य काचा "बुलेटप्रूफ' आहेत. राव व त्यांचा मुलगा केटीआर यांच्या खोलीतील काचाही उच्च प्रतीच्या आहेत. एवढेच नाही तर घरातील स्वच्छतागृहही "बुलेटप्रूफ' करण्यात आले आहे. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले असले, तरी राज्यातील गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आपल्या स्वप्नातील या घरात "केसीआर' गुरुवारी (ता. 24) प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. घर व कार्यालय एकत्र असलेल्या येथील परिसरात 50 सुरक्षा रक्षक चोवीस तास तैनात असणार आहेत. यात सशस्त्र सुरक्षा रक्षकांसह गुप्तचर सुरक्षा विभागाच्या सदस्यांचा समावेश असेल. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी या सदस्यांकडे असेल. मुख्यमंत्री निवासावर नजर ठेवण्याचे काम ते करणार आहेत. या महालात प्रवेश करण्यापूर्वी संबंधितांची सुरक्षेच्या नियमांनुसार सर्व तपासणी होणार आहे. त्यांच्याकडील मोबाईल फोन, घड्याळे व धातूच्या वस्तू बाहेर ठेवाव्या लागणार आहेत.

सुरक्षेवरील खर्चाचे समर्थन
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करता येणार नाही. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचे नियोजन करताना सर्व संभाव्य धोके विचारात घेणे आवश्‍यक असते. मुख्यमंत्र्यांचे हे घर सरकारी निवासस्थान असल्याने सुरक्षेसाठी होणारा खर्च योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया तेलंगणचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली. या बाहेरील कोणालाही आत डोकावता येऊ नये म्हणून घराभोवती उंचचउंच भिंतींचे कुंपण बांधलेले आहे.

Web Title: Andhra Pradesh Chief Minister bathroom Bulletproof