
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेला युवक एका युवतीच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी त्याने गुगलमॅप लावला. गुगलमॅपच्या दिशेने निघाला आणि थेट पाकिस्तानमध्ये पोहचला.
हैदराबादः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेला युवक एका युवतीच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी त्याने गुगलमॅप लावला. गुगलमॅपच्या दिशेने निघाला आणि थेट पाकिस्तानमध्ये पोहचला. पाकिस्तानने त्याला अटक केली आहे.
प्रशांत वैंदमचे (वय 30) स्वप्निका नावाच्या युवतीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले. तिने त्याला लोकेशन पाठवले. लोकेशन सेट करून प्रशांत तिला भेटण्यासाठी निघाला आणि पाकिस्तानच्या ताब्यात अडकला. परंतु, तो पाकिस्तानमध्ये पोहचला कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये प्रशांत दिसत असून, त्याच्या पाठिमागे एक पोलिसांच्या गणवेशातील व्यक्ती दिसत आहे. त्या व्यक्तीच्या छातीवर मुस्तफा नावाची नेमप्लेट दिसत आहे. पाकिस्तानने प्रशांतवर गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, प्रशांत तब्बल 31 महिन्यानंतर तो जीवंत असल्याचे समजले असून, पाकिस्तानमधील बहावलपूर येथील पोलिसांच्या ताब्यात आहे. पाकिस्तानने त्याला भारतीय गुप्तहेर असल्याच्या संशयाखाली अटक केली आहे. प्रशांतला टीव्हीवर पाहून आनंद झाला आहे, अशी माहिती त्याचे वडील बाबूराव वैंदम यांनी दिली.
बाबूराव वैंदम म्हणाले, 'प्रशांत हा स्वभावाने खूपच शांत आहे. प्रशांत 11 एप्रिल 2017 मध्ये कंपनीमध्ये कामासाठी गेला होता. परंतु, कामावरून तो परतलाच नाही. खूप शोधा शोध घेतली परंतु तो आढळला नाही. अखेर 29 एप्रिल 2017 रोजी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. एवढ्या वर्षात त्याचा काहीच शोध लागला नाही. पण, काल टीव्हीवर बातम्यामध्ये प्रशांतला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याची माहिती दाखवण्यात आली. शिवाय, त्याचा व्हिडिओही दाखवला गेला. तो तेलगू भाषेमध्ये बोलला. प्रशांत जीवंत असल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद झाला. प्रशांत गुप्तहेर नाही. एका युवतीच्या प्रेमात तो पडला होता. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार आहे.'
प्रशांत सोबत कंपनीमध्ये काम करत असलेल्या महिला सहकाऱयाने प्रशांतच्या वडिलांना सांगितले की, 'प्रशांत एका युवतीच्या प्रेमात पडला होता. स्वित्झर्लंड येथे असल्याचे त्याला माहित होते. तिला भेटण्यासाठी तो गेला आणि बेपत्ता झाला.' पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'पाकिस्ताने दोन युवकांना गुप्तहेर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान प्रशांत हा मैत्रिणीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला निघाला होता. पण, पाकिस्तानमध्ये कसा आलो हे माहित नसल्याचे त्याने सांगितले. पाकिस्तानने प्रसारीत केलेल्या व्हिडिओमध्ये प्रशांतने तेलगू भाषेत म्हटले आहे की, पाकिस्तानने मला ताब्यात घेतले आहे. कधी आणि कुठे घेतले हे समजले नाही. पण, मला एक महिन्यानंतर सोडतील अशी अपेक्षा आहे. दुसरा युवक हा मध्य प्रदेशातील आहे. दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोघांनी घुसखोरी करून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याची वृत्त दिले आहे.'