बिहारी मंत्र्यांच्या भाषेने भाजपचे सदस्य संतप्त

उज्ज्वलकुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 मार्च 2017

राजकारणात भाषा आणि सभ्यतेच्या गप्पा मारणारे नितीशकुमार अशा मंत्र्याची हकालपट्टी का करत नाहीत?
- सुशील मोदी, भाजप नेते

मस्तान यांच्या हकालपट्टीसाठी विधानसभेत गोंधळ

पाटणाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरणाऱ्या बिहारच्या एका मंत्र्याला सरकारमधून डच्चू देण्याच्या मागणीसाठी भाजप सदस्यांनी विधानसभेत आज गोंधळ घातला. या मंत्र्यांची हकालपट्टी होईपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा इशाराही भाजने दिला आहे.

अब्दुल जलिल मस्तान असे या कॉंग्रेसच्या मंत्र्याचे नाव असून, त्यांच्याकडे उत्पादन शुल्क खाते आहे. मोदींचा उल्लेख त्यांनी "दरोडेखोर' असा केला होता. आपल्या वक्तव्याबद्दल मस्तान यांनी माफी मागितली; पण भाजपच्या सदस्यांचे त्याने समाधान झाले नाही. मस्तान यांच्या हकालपट्टीच्या मागणीवर भाजप सदस्य ठाम आहेत. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मस्तान यांच्या विधानाचा निषेध करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. वैधानिक पदावरील कोणत्याही व्यक्तीचा कोणीही असा उल्लेख करू नये, असे मत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी व्यक्त केले. पण भाजप सदस्यांचे समाधान झाले नाही. कॉंग्रेसनेही मस्तान यांच्या वक्तव्याशी असहमती जाहीर केली आहे.

नोटाबंदीच्या मुद्द्यावर काल झालेल्या एका मेळाव्यात मस्तान यांनी मोदींचा उल्लेख "दरोडेखोर' असा केला तसेच त्यांच्या पोस्टरवर चप्पलही मारली होती. त्यांचे हे कृत्य व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपले गेले. या कृत्याचा गवगवा झाल्यावर आपण असे काही केलेच नसल्याचा पवित्रा मस्तान यांनी घेतला; पण भाजप सदस्यांचा संताप पाहून नंतर माफी मागितली. मस्तान यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यास, त्यांच्या या वागण्याला नितीशकुमार यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाईल, असा इशाराही भाजने दिला आहे.

Web Title: Angry members of the BJP ministers Bihari language