केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन

टीम ई सकाळ
गुरुवार, 18 मे 2017

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे (वय ६०) यांचे निधन झाले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दवे यांची प्रकृती अस्थिर होती. आज (गुरुवार) सकाळी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने "एम्स'मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकामागोमाग केलेल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. "माझे मित्र आणि आदरणीय सहकारी, केंद्रीय पर्यावरणमंत्री यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे धक्का बसला. ते एक समर्पित सेवक होते. पर्यावरण रक्षणासाठी ते अत्यंत आग्रही होते. मी काल संध्याकाळीच त्यांच्यासोबत महत्वाच्या धोरणांवर चर्चा केली. त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे', अशा शब्दांत मोदी यांनी दवे यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे.

दवे हे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील बडनगर येथे 6 जुलै 1956 रोजी झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नर्मदा नदीच्या बचावाच्या मोहिमेसाठी ते काम करत होते. त्यांच्या निधनाची वार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम ट्विटरद्वारे दिली.

दवे यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अनेक नेते, मंत्री यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 

Web Title: Anil Madhav Dave is no more