आप मुझे इतनी लगती है की...आझम खान यांच्या विधानानं लोकसभेत गोंधळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं. यामुळे लोकसभेत गोंधळ झाला.

नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान यांच्या विधानानं वाद झाला. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं. यामुळे लोकसभेत गोंधळ झाला.

तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान बोलायला उभे राहिले. त्यांनी तू इधर-उधर की ना बात कर… असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. यानंतर माझं विधान सदनाच्या कामकाजाच्या दृष्टीनं चुकीचं असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत आझम खान सदनातून निघून गेले. 

आझम खान यांचं विधान कामकाजातून वगळण्यात यावं असे आदेश दिले. विधानसभा, लोकसभा, राज्यसभेच्या कामाकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या खान यांनी त्यांच्या विधानाबद्दल त्वरित माफी मागायला हवी, अशी मागणी कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचं पावित्र्य प्रत्येकानं जपायला हवं, असं आवाहन केलं. 'संसदेच्या कामकाजातून हे विधान काढा, ते वक्तव्य वगळा, असं म्हणणं सोपं आहे. मात्र अशा मागण्या करण्याची गरजच का भासते? एकदा विधान केल्यावर ते लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळे आपण सर्वांनी संसदेचं पावित्र्य जपलं पाहिजे,' असं बिर्ला म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankhon mein ankhein: Uproar in Lok Sabha over Azam Khan's sexist comment