काश्‍मीरमध्ये आणखी एका पोलिसाच्या घरावर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 26 मार्च 2017

दहशतवाद्यांनी काल (शनिवारी) रात्री बडगाम जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोंधळ घातला आणि त्याच्या मुलाला, तसेच पुतण्याला ओलीस ठेवले. त्याचप्रमाणे घराच्या काचा फोडल्या आणि नंतर एका गाडीने पसार झाले. अशा प्रकारच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे काश्‍मीर खोऱ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

श्रीनगर - दहशतवाद्यांनी काल (शनिवारी) रात्री बडगाम जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोंधळ घातला आणि त्याच्या मुलाला, तसेच पुतण्याला ओलीस ठेवले. त्याचप्रमाणे घराच्या काचा फोडल्या आणि नंतर एका गाडीने पसार झाले. अशा प्रकारच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे काश्‍मीर खोऱ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दहशतवादी दोन मुलांना घेऊन एका गाडीतून पळून गेले. मात्र, नंतर त्यांना सोडून दिले आणि वाहनाला आग लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एम. सुभान भट असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तीन आठवड्यांपूर्वी शोपियॉं येथेही एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी घराच्या काचा फोडल्या होत्या. या घटनांमुळे गेल्या 26 वर्षांपासून दहशतवाद्यांशी लढा देत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक एम. सुभान भट यांना ठार मारण्याची दहशतवाद्यांची इच्छा होती. पूर्वी दहशतवादी असलेला आणि आता फुटीरतावादी नेता बनलेला मसरत अलम स्थानबद्ध असलेल्या बारामुल्ला जिल्हा कारागृहात भट सध्या कार्यरत आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Web Title: Another attack on Kashnmir police home