भाजपच्या आणखी एका ठाकूरने गोडसेंना ठरवले राष्ट्रवादी 

पीटीआय
बुधवार, 29 मे 2019

- भाजपच्या महिला आमदारांनी केले हे वक्तव्य.

इंदूर : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निवडणुकीदरम्यान नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता भाजपच्या आमदार उषा ठाकूर यांनी 'गोडसे हे राष्ट्रवादी होते. त्यांनी जीवनभर देशाची चिंता केली,' असे वक्तव्य केले. उषा ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उषा ठाकूर या मध्य प्रदेशातील महू विधानसभेचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने गोडसेला तुम्ही राष्ट्रवादी मानता का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना उषा ठाकूर म्हणाल्या, गोडसे हे राष्ट्रवादी होते. त्यांनी जीवनभर देशाची चिंता केली. त्यावेळी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली असेल, ज्यामुळे त्यांना असा निर्णय घ्यावा लागला. हे फक्त त्यांनाच माहिती होते, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, या संदर्भात त्यांना विचारले असता, व्हायरल झालेला व्हिडिओ 'एडिटेड व्हर्जन' आहे, अशी प्रतिक्रिया उषा ठाकूर यांनी दिली.  

प्रज्ञासिंहांकडून नोटीशीला अद्याप उत्तर नाहीच

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोडसेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना भाजपकडून नोटीस बजावण्यात आली होती. याप्रकरणी खुलासा करण्यास त्यामध्ये सांगण्यात आले होते. मात्र, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर दिले गेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another BJP leader Thakur calls Nathuram godse patriot