नीरव मोदीवर आणखी एक गुन्हा? 

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीदरम्यान त्याने सीमाशुल्क बुडवल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) त्याच्याविरोधात नवा गुन्हा दाखल करण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हिरे व्यापारी नीरव मोदीने केलेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीदरम्यान त्याने सीमाशुल्क बुडवल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) त्याच्याविरोधात नवा गुन्हा दाखल करण्याची शक्‍यता आहे. 

ईडीच्या तपासानुसार नीरव मोदी हा अमेरिका, दुबई व हॉंगकॉंगमध्ये कमी प्रतीचे हिरे चांगल्या प्रतीचे आहेत, असे दाखवून निर्यात करीत असे. तेच हिरे पुन्हा भारतात आयात केले जात असत. त्याद्वारे तो सीमाशुल्कात सवलत मिळवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याच्याविरोधात सीमाशुल्क कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल होऊ शकतो का, याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. डीआरआयने मोदीविरोधात 2014 मध्ये कारवाई केली होती.

सुरत विशेष आर्थिक क्षेत्रातील (एसईझेड) "फायर डायमंड इंटरनॅशनल' ही कंपनी कमी प्रतीचे हिरे जास्त दराचे दाखवून निर्यात करत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार 5 डिसेंबर 2014 रोजी डीआरआयने सहार विमानतळावरील कार्गो परिसरात कारवाई करत फायर डायमंड इंटरनॅशनल प्रा.लि.च्या सहा व फायरस्टार इंटरनॅशनल प्रा. लि.च्या दोन कन्साइनमेंट ताब्यात घेतल्या. हा माल कॅनडा, अमेरिका, दुबई व हॉंगकॉंग येथे पाठविण्यात येत होता. यातील हिरेजडित दागिन्यांची किंमत 43.10 कोटी रुपये दाखविण्यात आली होती; पण तपासणीत हा माल 4.93 कोटी रुपयांचाच असल्याचे निष्पन्न झाले होते. सुरत एसईझेड येथून मोदीच्या कंपनीने पाठवलेल्या मालाची किंमत एक हजार 112 कोटी रुपये दाखविण्यात आले होते; पण प्रत्यक्षात पाठविण्यात आलेला माल 74.63 कोटी रुपयांचाच असल्याचेही निष्पन्न झाले होते. 

Web Title: Another crime on nirav modi