बंगळूरमध्ये विनयभंगाची दुसरी घटना उघडकीस

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

घरी परतणाऱ्या या युवतीच्या मागून स्कूटरवर आलेल्या दोघांनी तिला हटकले. तिच्या पुढ्यात जाऊन गाडी उभी करत असताना एकाने तिला पकडले. तिच्या अंगावर येत तिला स्कूटरकडे तो ओढत आणत असल्याचे चित्रीकणात दिसले आहे.

 

बंगळूर - नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात बंगळूरमध्ये भररस्त्यात अनेक महिलांचा विनयभंग व छेडछाडीचे प्रकरण गाजत असतानाच अजून एका घटनेत एक युवती घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी तिचा विनयभंग केल्याचे बुधवारी उघडकीस आले आहे. या प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

कम्मनहल्ली भागात ही घटना घडली. घरी परतणाऱ्या या युवतीच्या मागून स्कूटरवर आलेल्या दोघांनी तिला हटकले. तिच्या पुढ्यात जाऊन गाडी उभी करत असताना एकाने तिला पकडले. तिच्या अंगावर येत तिला स्कूटरकडे तो ओढत आणत असल्याचे चित्रीकणात दिसले आहे. या वेळी त्याचा सहकारी गाडीवर बसलेला होता. संबंधित युवतीने प्रतिकार करीत सुटकेचा प्रयत्न केला असता त्याने तिला रस्त्यावरच ढकलून दिले आणि ते दोघे पळून गेले. त्या आधी युवतीला पकडून ठेवणाऱ्याला तिने थप्पड मारल्याचेही दिसत आहे. रहिवासी भागात लावलेल्या सीसीटीव्हीतील चित्रीकरणातून ही घटना 1 जानेवारीला मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडल्याचे दिसत असून, रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

बंगळूरमध्ये 31 डिसेंबरला एम. जी. रस्ता व ब्रिगेड रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही महिलांच्या सामूहिक छेडछाडीच्या व विनयभंगाच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर उघडकीस आलेल्या या घटनेबाबत पोलिस आयुक्त प्रवीण सूद म्हणाले की, याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला असून, बनसवाडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 31 डिसेंबरच्या घटनांचीही चौकशी सुरू असून आमच्याकडे अनेक पुरावे गोळा झाले आहेत. त्यामुळे याविरोधात फिर्याद दाखल झाली नाही तरी पोलिस स्वतःहून गुन्हा दाखल करतील. एम. जी. रस्त्यावरील 45 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी ट्‌विटरवरून दिली.
 

Web Title: Another molestation case in bangalore