अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मांवर प्रचारबंदीची कारवाई

अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मांवर प्रचारबंदीची कारवाई

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात चिथावणीखोर वक्तव्ये करणारे मोदी सरकारचे मंत्री अनुराग ठाकूर व खासदार प्रवेश साहिबसिंह वर्मा या भाजपच्या स्टार प्रचारकांवर निवडणूक आयोगाने अनुक्रमे ७२ तास व ९६ तासांची प्रचारबंदी घातली आहे.

निवडणुकीला जेमतेम आठवडा उरलेला असताना भाजप-‘आप’चे शेकडो नेते दिल्लीभर रोड शो व प्रचार सभांचा दणका उडवून देत आहेत. यामध्ये अरविंद केजरीवाल सरकारचा विकास विरुद्ध भाजपचे धार्मिक ध्रुवीकरण, यांच्यातील संघर्ष टोकाला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

आपविरुद्ध देशातील सारी सत्ता व ताकद पणाला लावून उतरलेल्या भाजपचे शंभरावर नेते दिल्लीभर फिरत आहेत. सामान्य दिल्लीकरांना मात्र भारत-पाकिस्तानसारख्या भाषेचा उबग आल्याचे चित्र आहे. जामियात आज माथेफिरू तरुणाने गोळीबार केल्यावर ठाकूर ट्रोल होत असून, देशाचा केंद्रीय मंत्रीच गोळ्या घाला, अशी भाषा करीत असेल तर दुसरे काय होणार? अशी प्रतिक्रिया उमटली आहे. ठाकूर व वर्मा यांच्या भाषेविरुद्ध आयोगाने नोटिसा बजावत त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली. त्यांच्यावर आयोगानेच कारवाई केल्याने पक्षाला यापुढे कारवाई करण्यासारखे काही उरले नाही, असे सागून भाजपने हात झटकले आहेत. दरम्यान, भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांना ‘दहशतवादी’ म्हटल्याच्या निषेधार्थ आपने निवडणूक आयोगाच्या प्रवेशद्वारावर आज धरणे आंदोलन केले आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने ‘आप’ला दिल्लीत पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षनेते डेरेक ओब्रायन यांनी, दिल्लीतील बंगाली बांधवांनी ‘आप’लाच मतदान करावे, असे आवाहन केले. दक्षिण व पूर्व दिल्लीत बंगालीभाषकांची संख्या लक्षणीय आहे.

आंदोलनाचे आयोजन ‘आप’चेच
शाहीनबागेतील आंदोलनांवर होणारा खर्च ‘आप’च्या खात्यात टाकावा, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. सीएएच्या विरोधातील आंदोलनांचे आयोजन ‘आप’ करीत असल्याचा गंभीर आरोपही भाजपने केला आहे. निवडणुकीच्या काळात दिल्ली परिसरातून ३८४ अवैध हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. खबरदारी म्हणून परवाना असलेली ५,५९२ हत्यारेही पोलिसांनी जमा करून घेतली आहेत. दिल्ली पोलिस कायद्यानुसार आतापावेतो ९६,३५५ लोकांविरुद्ध, तर अबकारी कर कायद्यांतर्गत ६,००१ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पत्रकारांचीच धरपकड
‘सीसीए’च्या विरोधात होणाऱ्या आंदोलनांचे, निदर्शनांचे वृत्तांकन करण्यास जाणाऱ्या पत्रकारांवरच दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने पत्रकारांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. राजघाटावर आज वृतांकनासाठी गेलेले ज्येष्ठ पत्रकार व नवज्योतीचे ब्युरो चीफ शिवेश गर्ग यांच्यासह राजेशकुमार व पार्थो घोष या तीन पत्रकारांना पोलिसांनी पकडले व ताब्यात घेतले. गर्ग हे भारत सरकारचे अधिस्वीकृती पत्र दाखवत असतानाही पोलिसांनी त्यांचे काही न ऐकता सुमारे शंभर आंदोलकांसह तिघांनाही गाडीत टाकले. रात्री उशिरापर्यंत त्यांची सुटका झालेली नव्हती. तसेच, संजय के. झा आणि एस. ए. पांडे या दोन पत्रकारांवरही पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप प्रेस क्‍लब ऑफ इंडियाने केला असूल, पोलिसांच्या या अत्याचारांचा निषेध प्रेस क्‍लबचे अध्यक्ष आनंद सहाय यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com