मायावतींचा अपमान हा माझा अपमान: अखिलेश

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

उत्तर प्रदेश अत्याचार प्रदेश बनला आहे. भाजप नेत्यांनी देवालाही धर्माच्या आधारावर वाटले. संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करणार आहोत. आता मायावतींचा सन्मान हा माझ्या सन्मानासारखा आहे.

लखनौ : बसप आणि सप एकत्र आले आहे, हे मला भाजपला सांगायचे आहे. मायावती आणि मी आता एकच असून, मायवतींचा अपमान हा माझा अपमान असेल, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.

लोकसभेसाठी 38-38 जागांचे वाटप झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत निर्णय जाहीर केला. लोकसभा निवडणुकीत भाजपला सामोरे जाण्यासाठी एकत्र येऊन लढण्याबाबत अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात नुकतीच दिल्लीत चर्चा झाली होती. यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते. आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी अनुकूलता दर्शविल्यानंतर प्रथमच त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या आघाडीतून काँग्रेसला पूर्णपणे वगळले आहे.

अखिलेश यादव म्हणाले, की उत्तर प्रदेश अत्याचार प्रदेश बनला आहे. भाजप नेत्यांनी देवालाही धर्माच्या आधारावर वाटले. संपूर्ण देशात अराजकता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मिळून भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करणार आहोत. आता मायावतींचा सन्मान हा माझ्या सन्मानासारखा आहे. भाजप नेत्याने मायवतींना काही बोलले तर सपच्या कार्यकर्त्याने त्याला प्रत्युत्तर द्यावे. उत्तर प्रदेशात महिला, मुलींवर अत्याचार वाढले. उत्तर प्रदेशने यापूर्वीही अनेक पंतप्रधान दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी मायवतींना पाठिंबा देण्याबाबत पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती होईल, असे वाटते.

Web Title: Any insult to Mayawati is my insult says Akhilesh Yadav