फेक मेसेजवर समाधान शोधा केंद्राचे 'व्हॉट्‌सऍप'ला आवाहन

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावरील फेक मेसेजमुळे जमावाकडून होणाऱ्या हत्यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, "व्हॉट्‌सऍप'ने ठोस उपाययोजना करून अशा मेसेजला आवर घालावा, अशी सूचना आज इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. यात अपयश आल्यास कंपनीला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

"व्हॉट्‌सऍप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांनी आज रविशंकर प्रसाद यांची दिल्लीत भेट घेत चर्चा केली. फेक मेसेज व इतर तक्रारींच्या जलद निवारणासाठी "व्हॉट्‌सऍप'ने एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. कंपनीने आपला डेटा भारतातच स्टोअर करावा; तसेच "व्हॉट्‌सऍप'द्वारे पसरविण्यात येणारा अक्षेपार्ह मेसेज रोखण्यासाठी तांत्रिक समाधान शोधावे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी या बैठकीनंतर दिली. सोशल मीडियाचा गैरवापर टाळण्यासाठी यूजर्समध्ये जनजागृती करावी, असेही या वेळी सुचविण्यात आले. 

"व्हॉट्‌सऍप'ने भारतातील कायद्यांचे पालन करावे; तसेच कंपनी म्हणून अधिकृतरीत्या नोंदणी करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या असून, याची अंमलबजावणी न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा रविशंकर प्रसाद यांनी दिला. 
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या अफवांमुळे देशात विविध ठिकाणी जमावाकडून व्यक्तींची हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर "व्हॉट्‌सऍप'वर सर्वाधिक टीकेची झोड उठली होती. 

"व्हॉट्‌सऍप''ला अटी मान्य 
इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "व्हॉट्‌सऍप'ला नोटीस धाडल्यानंतर कंपनीने समोर ठेवलेल्या अटी मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनी म्हणून भारतात नोंदणी, तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती; तसेच कायद्यांचे पालन करण्यास कंपनीने सहमती दर्शविल्याचे प्रसाद यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, डॅनियल यांनी या बैठकीबाबत कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही. 

Web Title: Appeal to whatsapp find solution on Fake message