काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पटोले यांची नियुक्ती;सहा कार्याध्यक्ष व दहा उपाध्यक्षांचीही नियुक्ती 

nana patole
nana patole

नवी दिल्ली - विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले नाना पटोले यांची आज काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत सहा कार्याध्यक्ष आणि दहा उपाध्यक्ष अशी ‘टीम’ देण्यात आली आहे. कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत प्रादेशिक समतोल राखल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला असला तरी कोकण विभागाला डावलल्याचा सूर उमटू लागला आहे. 

मावळते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या योगदानाचे आभार मानताना त्यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय काँग्रेसमधील नेते यांना संसदीय मंडळात सामावून घेण्यात आले आहे. आता थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदासोबत विधिमंडळ पक्षनेतेपद राहील. 

नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील शिवाजीराव मोघे, मराठवाड्यातील बसवराज पाटील, मुंबईतील मोहम्मद आरीफ नसीम खान, उत्तर महाराष्ट्रातील कुणाल रोहिदास पाटील, मुंबईतील चंद्रकांत हांडोरे आणि सोलापूरच्या प्रणिती शिंदे हे कार्याध्यक्ष असतील. यातील कुणाल पाटील हे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र आहेत. तर, प्रणिती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या कन्या आहेत. एकनाथ गायकवाड, संजय निरुपम या मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना पटोले यांच्या ‘टीम’मध्ये स्थान मिळालेले नाही. 

मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये प्रमुख चेहरे असलेल्या माजी मंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हांडोरे यांना कार्याध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. यातील नसीम खान हे उत्तर भारतीय मुस्लिम चेहरा मानले जातात. त्यामुळे कोकण विभागाला प्रतिनिधित्व मिळाले नसल्याचा सूर उमटू लागला आहे. 

यासोबतच, जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी यांचे पुत्र शिरिष मधुकरराव चौधरी, पुण्यातील माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार पुण्यातील (विधान परिषद) आमदार मोहन जोशी, विदर्भातील माजी मंत्री रणजित कांबळे, जालन्याचे कैलाश कृष्णराव गोरंटियाल, मराठवाड्यातील बी. आय. नगराळे, उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक) शरद आहेर, अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रमुख एम. एम. शेख, आणि कोकणातील नेते माणिक मोतिराम जगताप यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

संसदीय मंडळात ३७ जण  
पक्षाचे उमेदवार निवडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संसदीय मंडळामध्ये नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील, केंद्रीय काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनाही त्यात सामावून घेण्यात आले आहे, संसदीय मंडळात ३७ जणांचा समावेश आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे महाराष्ट्र प्रभारी, प्रदेश काँग्रेस समितीचे सर्व कार्यकारी अध्यक्ष, प्रभारी सचिव आणि संलग्न संस्थांचे प्रमुख देखील संसदीय मंडळाचे पदसिद्ध पदाधिकारी असतील. 

जिल्हानिहाय समन्वय समित्या 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी रणनितीची आखणी, उमेदवार निवड यासाठी जिल्हानिहाय समन्वय समित्यांची देखील घोषणा झाली आहे. या समितीमध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष, दोन्ही सभागृहांमधील विधिमंडळ पक्षनेते माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष प्रभारी सचिव, कार्यकारिणी सचिव, जिल्हाध्यक्ष, आजी माजी, आमदार, खासदार आदींचाही यात समावेश असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com