लष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा - अरुण जेटली

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जुलै 2017

कॅगचा अहवाल हा विशिष्ट काळापुरता (2013) मर्यादित आहे; मात्र आता शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, त्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरणही करण्यात आले आहे

नवी दिल्ली - भारतीय लष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा असल्याची माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज (मंगळवार) राज्यसभेत दिली. लष्कराकडे केवळ 10 दिवस पुरेल इतकाच दारूगोळा व सामग्री उपलब्ध असल्याचा दावा कॅगने आपल्या अहवालात केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज राज्यसभेच्या कामकाजादरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

जेटली म्हणाले, ""कॅगचा अहवाल हा विशिष्ट काळापुरता (2013) मर्यादित आहे; मात्र आता शस्त्रास्त्र खरेदीची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, त्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरणही करण्यात आले आहे. अलीकडील काळात दारूगोळा, तसेच शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली असून, त्याचा लष्कराकडे मुबलक साठा आहे.''

शस्त्र खरेदी प्रक्रियेबाबत अलीकडील काही दिवसांत निर्णय घेण्यात आला आहे. हे आइस्क्रीम खरेदी करण्यासारखे नसून, केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत काहीही केलेले नाही. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे निष्क्रिय होते. देशाला अद्याप पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळालेला नाही, अशी टीका कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली.

तत्कालीन "यूपीए' सरकारच्या काळात शस्त्र खरेदीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांवर आत्ताच्या केंद्र सरकारने पुढे कोणतीही कार्यवाही केलेली नाही. लष्कर सज्जतेविषयी संरक्षण मंत्रालयाने तयार केलेली 16,500 कोटी रुपये खर्चाची योजना अद्याप अमलात आलेली नाही, असा आरोप कॉंग्रेस नेते रिपून बोरा यांनी केला.

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर अशी स्थिती असताना आपल्याकडे 10 दिवस पुरेल इतकाच दारूगोळा असणे, ही बाब गंभीर आहे. याविषयी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, केंद्राने देशाला वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
- राम गोपाळ यादव, सप नेते

Web Title: Armed forces sufficiently equipped: Defence Minister Arun Jaitley