'यूएन'च्या अहवालावर लष्करप्रमुख म्हणाले, लष्कराची कामगिरी चोख

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

लष्करप्रमुख रावत यांनी हा अहवाल ''चुकीचा, हेतूपुरस्सर आणि प्रवृत्तपणे'' देण्यात आला आहे, असे सांगितले.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालावर आज (बुधवार) लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी वक्तव्य केले. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्यावर त्यांनी सांगितले, की ''हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात 'प्रवृत्त' करुन मांडण्यात आला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेल्या अहवालावर आम्हाला लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. भारतीय लष्कराची कामगिरी चोख आहे'', असेही ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाने जम्मू काश्मीरच्या हिंसाचाराबाबत अहवाल सादर केला होता. या अहवालात लष्कराच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. हा अहवाल सादर झाल्यानंतर लगेचच भारताने संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर लष्करप्रमुख रावत यांनी हा अहवाल ''चुकीचा, हेतूपुरस्सर आणि प्रवृत्तपणे'' देण्यात आला आहे, असे सांगितले. याबाबतचा अहवाल 14 जूनला जाहीर करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रसंघाने जम्मू काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अहवाल जारी केला होता.   

तसेच याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की या अहवालात ज्या बाबी देण्यात आल्या. त्या खोट्या असून, देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेचा भंग करण्याचा यामधून प्रयत्न करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर हे राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे. 

Web Title: Army chief Bipin Rawat slams UN report on Jammu and Kashmir human rights