लष्कराच्या मार्गदर्शनामुळे काश्‍मिरी विद्यार्थी "आयआयटी'त

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

काश्‍मीरमधील होतकरु; परंतु संधींपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लष्कराकडून हे मार्गदर्शन केले जाते. भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज या तुकडीमधील विद्यार्थ्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

नवी दिल्ली - भारतीय लष्कराच्या काश्‍मीरमधील "सुपर 40' मधील तुकडीपैकी नऊ विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रामधील देशातील सर्वांत अवघड परीक्षांपैकी एक मानल्या जात असलेल्या "जेईई ऍडव्हान्सड' परीक्षा पास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना आता भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळविणे शक्‍य होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जम्मु काश्‍मीरमधील परिस्थिती अक्षरश: धुमसत असतानाच आलेले वृत्त अत्यंत सुखद मानले जात आहे.

भारतीय लष्कराकडून गेल्या तीन वर्षांपासून काश्‍मीरमधील स्थानिक विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येते. याआधी, सुपर 40 तुकडीमधील 26 मुले व दोन मुलींना "जेईई मेन्स' परीक्षेमध्ये यश आले होते. या तुकडीमधील इतर पाच जणांनी वैयक्तिक कारणांकरिता परीक्षेस बसण्यास असमर्थता दर्शविली होती. या तुकडीमध्ये काश्‍मीर खोऱ्यामधील पाच विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. लष्कराच्या मार्गदर्शन वर्गामध्ये विद्यार्थिनी सहभागी होण्याची ही पहिलीच घटना आहे.

भारतीय लष्कर, सामाजिक जबाबदारी व शिक्षण केंद्र (सेंटर फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड लर्निंग) आणि पेट्रोनेट एलएनजी यांच्याकडून काश्‍मीरमधील होतकरु; परंतु संधींपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे मार्गदर्शन केले जाते. भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज या तुकडीमधील विद्यार्थ्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

काश्‍मीरमधील आंदोलने व लष्करावर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या या वृत्तामुळे भारतीय लष्करावर टीका करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले गेल्याचे मानले जात आहे.

Web Title: Army coaching helps 9 Kashmiri students crack JEE