पाकीस्तानच्या हल्ल्याचा कट उधळला

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे.

श्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे.

"बॅट'मध्ये दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. रविवारी "बॅट'ने सीमेवरील भारतीय ठाण्यांवर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नियंत्रण रेषेजवळ असलेल्या दाट जंगलांचा फायदा घेत घुसखोरी करण्यास सुरवात केली होती. त्यांना पाठबळ म्हणून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर रॉकेट लॉंचर्स आणि तोफगोळ्यांचा मारा होत होता. मात्र, सीमेवर अत्यंत सावध असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी घुसखोरांच्या हालचाली हेरून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन घुसखोर मारले गेले. ही चकमक काल रात्रभर सुरू होती. चकमकीचा आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत काही घुसखोर सीमेपार पळून जाण्यात यशस्वी ठरल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आले. मात्र, घटनास्थळावरून मिळालेले साहित्य आणि एकूण परिस्थिती पाहता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीमेवरील भारतीय लष्कराच्या ठाण्यांवर मोठा हल्ला करण्याची त्यांची योजना होती, हे स्पष्ट होत असल्याचे लष्कराने सांगितले.

भारतीय जवानांसारखे कपडे 
चकमकीनंतर जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. दाट जंगल आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहिमेला वेळ लागत आहे. मात्र, जवानांना मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्रीसारखे साहित्य आढळून आले असल्याचे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले. या घुसखोरांनी पाकिस्तानी सैन्यासारखेच कपडे घातले होते, त्यांच्याकडील साहित्यही पाकिस्तानी बनावटीचे होते. भारतीय जवानांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी काही घुसखोरांनी भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या आणि लष्कराच्या जुन्या गणवेशाप्रमाणे कपडे घातले होते, असेही प्रवक्‍त्याने सांगितले. घुसखोरांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती.

Web Title: Army Foils BAT Attempt to Attack on New Year Eve