काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या जवानाची हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातून अपहरण केलेल्या भारतीय जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. औरंगजेब असे या जवानाचे नाव आहे. पुलवामातील गुसू या भागात औरंगजेब यांचा मृतदेह आढळून आला आहे.

औरंगजेब हे हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर समीर टायगरला कंठस्नान घातलेल्या कमांडो ग्रुपचा सदस्य होते. दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यातून गुरुवारी (ता. 14) त्यांचे अपहरण करण्यात आले. औरंगजेब ईदसाठी सुटी घेऊन घरी जात होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्याने जाणारी एक गाडी थांबवून औरंगजेबला त्याच्या गावापर्यंत सोडविण्याची चालकाला विनंती केली. या गाडीतून जात असताना दहशतवाद्यांनी ती अडविली आणि औरंगजेबचे अपहरण केले होते. ते राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे जवान होते.

ज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला. इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बुखारी हे लाल चौकातील प्रेस एन्क्लेव्हमध्ये असलेल्या कार्यालयातून निघाले होते. बुखारी गाडीत बसताना काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने रमजानच्या पार्श्वभूमीवर सीजफायरची घोषणा केली आहे. म्हणजेच दहशतवाद्यांविरोधात कारवाई बंद आहे. परंतु सीजफायरदरम्यान काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आहे. बंदीपोरा जिल्ह्यामध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांबरोबर चकमक होऊन त्यात दोन दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक जवानही हुतात्मा झाला. बंदीपोरामधील पनार जंगलात ही घटना घडली.

Web Title: Army jawan abducted & killed in kashmir