पाकची सीमेवर आगळीक सुरूच; गोळीबारात जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

जूनमधील आगळीक 
23 : शस्त्रसंधी भंगाच्या घटना 
02 : घुसखोरीच्या घटना 
01 : "बॅट'कडून हल्ला 
03 : जवान हुतात्मा 
01 : नागरिक ठार 
12 : जखमींची संख्या 
- चालू वर्षात पाकिस्तानकडून एकूण 223 शस्त्रसंधी भंगाच्या घटना आणि 50 वेळा घुसखोरीचा प्रयत्न 
 

जम्मू/श्रीनगर : सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक अद्यापही सुरूच असून, शनिवारी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचा भंग केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात प्रादेशिक सेनेचा जवान हुतात्मा झाला. त्याचबरोबर त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून, त्या दांपत्याच्या दोन मुलींसह आणखी एक मुलगी जखमी झाली. भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान जखमी झाले. 

दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या उप उच्चायुक्तांना पाचारण करून भारतावरच शस्त्रसंधी भंगाचा आरोप करत उलटा कांगावा केला. मात्र, उप उच्चायुक्त जे. पी. सिंह यांनी संपूर्ण वर्षभरातील आकडेवारी सादर करत आज झालेल्या शस्त्रसंधी भंगाबाबत पाकिस्तानकडे निषेध नोंदविला. 

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंच भागात आज सकाळी भारतीय हद्दीतील रहिवासी भागात पाकिस्तानी सैन्याने तोफा डागल्या तसेच गोळीबारही केला. सीमेजवळील करमरा गावातील प्रादेशिक सेनेचे जवान मोहम्मद शौकत आणि त्यांची पत्नी साफिया बी यांच्या घरावर तोफगोळा येऊन पडल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रुबीना कौसर (वय 12), झायदा कौसर (वय 6) या त्यांच्या दोन लहान मुली आणि नाझिया बी या तिघी जणी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, बांदीपोरा येथील हाजिन परिसरात दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले. अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे. 

आठ महिला जखमी 
दक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांवर पेलेट गनचा वापर केल्यामुळे सुमारे आठ महिला जखमी झाल्या. या महिला पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या आणि कोणतेही कारण नसताना सुरक्षा रक्षकांनी पेलेटचा मारा केल्याचा आरोप नागरिकांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी या आरोपाचा इन्कार करताना हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्‍या बुऱ्हान वणीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत या महिला सहभागी झाल्या होत्या, असे सांगितले. 

काश्‍मीरमध्ये संचारबंदी 
हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान वणी याचा खात्मा होऊन एक वर्ष झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काश्‍मीरमधील तीन शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोणतीही परिस्थिती उद्‌भवल्यास ती निपटण्यासाठी सुमारे वीस हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटनांनी यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठीही योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. 

जूनमधील आगळीक 
23 : शस्त्रसंधी भंगाच्या घटना 
02 : घुसखोरीच्या घटना 
01 : "बॅट'कडून हल्ला 
03 : जवान हुतात्मा 
01 : नागरिक ठार 
12 : जखमींची संख्या 
- चालू वर्षात पाकिस्तानकडून एकूण 223 शस्त्रसंधी भंगाच्या घटना आणि 50 वेळा घुसखोरीचा प्रयत्न 
 

Web Title: Army jawan, wife killed as Pakistan continue to fire shells in Poonch sector of Jammu and Kashmir