लष्करातील अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या ; मेजरला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

शैलजा या शनिवारी सकाळी 10 वाजता फिजिओथेरपी सेशनच्या लष्करी रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांचा वाहनचालक शैलजा यांना परत नेण्यासाठी रुग्णालयात आला.

मेरठ : राजधानी दिल्लीतील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कँट परिसरात काल (शनिवार) लष्करातील अधिकाऱ्याची पत्नी शैलजा द्विवेदी यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी लष्करातील मेजरला पोलिसांनी अटक केली. निखिल हांडा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.  

निखिल हांडा हे यापूर्वी दीमापूर येथे तैनात होते. शैलजा द्विवेदी यांच्या हत्येप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली. शैलजा यांच्या मोबाईलवरून हांडा यांना शेवटचा फोन करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कँटच्या परिसरात शनिवारी शैलजा यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर सगळीकडे याबाबत चर्चा सुरु होत्या.

शैलजा या शनिवारी सकाळी 10 वाजता फिजिओथेरपी सेशनच्या लष्करी रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, काही वेळानंतर त्यांचा वाहनचालक शैलजा यांना परत नेण्यासाठी रुग्णालयात आला. मात्र, तेव्हा शैलजा रुग्णालयात आल्या नसल्याचे समजले. सायंकाळचे 4 वाजल्यानंतरही शैलजा घरी परतल्या नसल्याने त्यांच्या पतीने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 

दरम्यान, पोलिसांना शनिवारी सूचना मिळाली होती, की एका महिलेचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिथे पोचल्यावर त्यांनी मृतदेहाचे निरीक्षण केल्यावर त्यांची हत्या गळा चिरून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. 

Web Title: Army Majors wife killing Prime suspect arrested from UP