बेळगाव जिल्ह्यातील जवान राहुल चव्हाण यांना सेना मेडल जाहीर

तानाजी बिरनाळे
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

  • ढोणेवाडी (जि. बेळगाव) येथील जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर
  • 15 जानेवारी 2020 रोजी आर्मी डे दिवशी करण्यात येणार प्रदाण.
  •  काश्मीर येथे राहुल यांनी केला होता दोन दहशतवाद्यांचा खात्मा. त्याबद्दल गाैरव.

 मांगूर - ढोणेवाडी (जि. बेळगाव) सारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे वृत्त मनाशी बाळगून सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेले जवान राहुल चव्हाण यांना स्वातंत्र्यदिनी सेना मेडल जाहीर झाले. 15 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या आर्मी डे दिवशी प्रदान करण्यात येणार आहे.

ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या राहुल चव्हाण यांनी बिकट परिस्थितीवर मात करून देशसेवा हीच ईश्वरसेवा हे मनाशी बाळगून गेली सहा वर्षांपासून जम्मू - काश्मीर येथे दहशतवादाचा मुकाबला करण्याचे काम करीत आहेत. यामध्ये त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा देखील केला आहे.

राहुल यांनी सरकारी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर कारदगा येथील डीएस नाडगे हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर हुपरी येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवी शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासूनच देशसंरक्षणासाठी मिलिटरीमध्ये जाण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी कसोशीने सराव सुरू केला. मनामध्ये देशसेवेची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी जिद्दीने भरतीमध्ये उतरून १९ जून २०१३ रोजी भारतीय सैन्य दलात त्यांची निवड झाली. प्रारंभी बंगळूर  येथे प्रशिक्षणार्थी सेवा त्यांनी बजावली. यानंतर जम्मू - काश्मीर येथील बडगाम जिल्ह्यामध्ये त्यांनी देशसेवा बजावली.

गेल्या वर्षी काश्मीर येथे त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांंनी केलेल्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना या पदकाने सन्मानीत करण्यात येणार आहे. सेना पदक हे भारतीय सैन्यासाठी एक असामान्य कौतुक पदक म्हणून दिले जाते. जवान राहुल चव्हाण यांच्या या यशस्वी कारकिर्दीमध्ये नेहमीच त्यांना त्यांची आई विमल, वडील कृष्णा, पत्नी स्नेहल, याचबरोबर मित्र परिवार व मेजर विजेश कुमार यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army Medal was awarded to Jawan Rahul Chavan of Belgaum district