सैन्य दलातील पेपरफुटीप्रकरणी पुण्यातून आठ जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पुणे : सैन्य दलातील भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेची प्रश्‍नपत्रिकेची तीन लाख रुपयांना विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुण्यातून आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

पुणे : सैन्य दलातील भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेची प्रश्‍नपत्रिकेची तीन लाख रुपयांना विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुण्यातून आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

हडपसर येथील भेकराई नगर येथील एका केंद्रावर आज (रविवार) सैन्य दलातील भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र शनिवारपासूनच या परीक्षेची प्रश्‍नपत्रिकेची विक्री करण्यात येत होती. त्यासाठी आरोपींनी शनिवारी रात्री 70 ते 80 उमेदवारांना भेकराई नगर येथे बोलावले. प्रश्‍नपत्रिका पुरविण्यासाठी त्यांनी प्रत्येकाकडून तीन लाख रुपये घेतले आणि व्हॉटसऍपद्वारे प्रश्‍नपत्रिका पाठविली. ठाणे पोलिसांना याबाबत सर्वप्रथम माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना याबाबतची माहिती दिली. सहायक आयुक्त सुरेश भोसले, युनिट एकचे विनोद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोघांची नावे संतोष शिंदे आणि धनाजी जाधव अशी आहेत. जाधववर यापूर्वीही सैन्य दलातील भरतीमधील गैरव्यवहारप्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ठाणे पोलिसांनी या प्रकरणी देशभरातील विविध ठिकाणी कारवाई करत छापे टाकले आहेत. नागपूर, पुणे, नाशिक आणि गोवा येथे केलेल्या कारवाईत आतापर्यंत 18 आरोपींना तर 350 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आज सकाळी नऊ वाजता देशभरातील विविध केंद्रात सैन्य दलातील भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, पेपरफुटीच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नऊ केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

Web Title: Army paper leaked; eight arrested