अस्वस्थ दार्जिलिंग पेटले; लष्कराचा 'फ्लॅग मार्च'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जून 2017

जीजेएम संघटनेचे नेते बिमल गुरुंग यांनी दार्जिलिंगचा मुख्यमंत्री मीच असल्याचे सांगत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आंदोलन थांबवून दाखवावेच, असे आव्हान दिले आहे

दार्जिलिंग - गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) संघटनेचे कार्यकर्ते व पोलिस दलामध्ये संघर्ष झाल्याने निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आज (शुक्रवार) कायम राहिली. काल झालेल्या या संघर्षामध्ये पोलिसांच्या वाहनांस आग लावून देण्यात आली होती.

याचबरोबर, संघटनेने पुकारलेल्या बंदामुळे दार्जिलिंगमधील परिस्थिती अधिकच चिघळली. स्वतंत्र गोरखालॅंडच्या मागणीसाठी या संघटनेकडून जाळपोळ करण्यात आल्यानंतर भारतीय लष्कराकडून कालिंपोंग, आर्जीलिंग आणि कुर्सेओंग भागामध्ये ध्वज संचलन (फ्लॅग मार्च) करण्यात आले. लष्कराच्या सहा तुकड्यांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तीन तुकड्याही या तणावग्रस्त भागामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जीजेएम संघटनेचे नेते बिमल गुरुंग यांनी दार्जिलिंगचा मुख्यमंत्री मीच असल्याचे सांगत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता आंदोलन थांबवून दाखवावेच, असे आव्हान दिले आहे.

Web Title: Army stages flag march in Darjeeling