एआयडीएमकेचे नेते दिनकरन यांना अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

तमिळनाडूतील एआयडीएमकेचा नेता टी.टी.व्ही. दिनकरन आणि त्यांचे जवळचे सहकारी मल्लिकार्जुन यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

नवी दिल्ली - तमिळनाडूतील एआयडीएमकेचे नेते टी.टी.व्ही. दिनकरन आणि त्यांचे जवळचे सहकारी मल्लिकार्जुन यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय आणि एआयडीएमकेच्या नेत्या शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे पक्षात पूट पडली आणि जयललिता यांच्या जागेवरील पोटनिवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दोन पाने असलेले एआयडीएमकेचे अधिकृत निवडणूक चिन्ह शशिकला यांच्या गटाला मिळावे यासाठी दिनकरन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी दिनकरन यांची गेल्या आठवड्यापासून चौकशी सुरू होती. मात्र चौकशीदरम्यान त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली. आज (बुधवार) दुपारी त्यांना न्यायालयात हजर करणार आहेत. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात येणार आहे.

Web Title: Arrested last night, TTV Dinakaran to be produced in court today