नजरकैद शिथिल

श्रीनगर - राज्यपालांच्या परवानगीनंतर नॅशनल कॉन्फरन्सच्या शिष्टमंडळाने रविवारी पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली, यानंतर अब्दुल्ला त्यांच्या पत्नी मोली, पक्षाचे नेते मोहंमद अकबर लोन आणि हसनैन मसुदी अभिवादन करताना.
श्रीनगर - राज्यपालांच्या परवानगीनंतर नॅशनल कॉन्फरन्सच्या शिष्टमंडळाने रविवारी पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली, यानंतर अब्दुल्ला त्यांच्या पत्नी मोली, पक्षाचे नेते मोहंमद अकबर लोन आणि हसनैन मसुदी अभिवादन करताना.

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘पीडीपी’ नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या (ता. ७) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेणार आहे.

जम्मू आणि काश्‍मीरच्या प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर आज हे शिष्टमंडळ अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या भेटीला गेले. 

राज्यातील राजकीय प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांची नजरकैद आणि स्थानबद्धतेतून सुटका केली जावी, अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली. काश्‍मीर खोऱ्यामध्ये २४ आक्‍टोबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार असून, आजच्या भेटीदरम्यानही नेत्यांनी हाच मुद्दा पक्षाच्या अध्यक्षांसमोर मांडला. दोन महिन्यांनंतर स्वपक्षीय नेत्यांना भेटण्याची संधी मिळाल्याने उमर यांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले.

त्यांनी या नेत्यांशी तीस मिनिटे चर्चा केली. उमर यांना त्यांच्या हरी निवास पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले आहे. या भेटीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे देविंदरसिंह राणा पत्रकारांना म्हणाले, की फारुख अब्दुल्ला यांच्याशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. राजकीय प्रक्रिया सुरू करायची असेल, तर या नेत्यांना सोडणे गरजेचे आहे. राज्यातील ३८० पंचायतींच्या निवडणुका लढायच्या असतील तर पक्षाध्यक्षाची परवानगी गरजेची असते. मात्र, त्यांनाच बंदिस्त ठेवण्यात आले आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील स्थिती सामान्य असून, नागरिक समाधानाने राहत आहेत. काश्‍मिरी नागरिकांना आता देशातील अन्य नागरिकांप्रमाणे अधिकार मिळाले आहेत.
- प्रकाश जावडेकर, माहिती आणि प्रसारणमंत्री

बाजारात गर्दी
श्रीनगर - श्रीनगर शहरात आज आठवडी बाजारात नागरिकांची गर्दी दिसून आली. तसेच, काही भागांत दुकानेही सुरू झाल्याचे चित्र होते. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठ बंदच राहिली होती. कलम ३७० काढण्याच्या निर्णयानंतर आज सलग ६३व्या दिवशी शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम दिसून आल्याने जनजीवन विस्कळितच राहिले. 

टीआरसी चौक-लाल चौक मार्गावर आज सकाळी संडे मार्केटचा बाजार भरला. अनेक फेरीवाल्यांनी आपले स्टॉल लावले होते. बाजारात वस्तूखरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com