Independence Day : Article 370 रद्द केल्याने प्रगतीची दारे उघडतील : राष्ट्रपती

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

- जम्मू- काश्‍मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर व लडाख या राज्यांतील नागरिकांसाठी अंतिमतः विशेष फायदेशीर ठरेल

- विकास, समान संधी व प्रगतीची नवी दालने उघडतील

स्वातंत्र्यदिन : नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू- काश्‍मीर व लडाख या राज्यांतील नागरिकांसाठी अंतिमतः विशेष फायदेशीर ठरेल व त्यांच्यासाठी विकास, समान संधी व प्रगतीची नवी दालने उघडतील, अशी भावना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज व्यक्त केली. 

73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा आलेख मांडताना विविध मुद्द्यांना स्पर्श केला. सरकार लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. सुब्रमण्यम भारती यांचे तमिळ वचन उद्‌धृत करताना राष्ट्रपती म्हणाले, की समाजाच्या अंतिम रांगेत असलेल्यांसाठी आम्ही आमच्या संवेदना कायम व सदैव जाग्या ठेवूयात. आमची सर्वसमावेशक संस्कृती, बंधुभाव, आदर्शवाद, करुणा या जीवनमूल्यांच्या सावलीत आपण कायम प्रगतिपथावर अग्रेसर राहूयात. 

"ज्या पिढीने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचा उद्देश केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर प्रत्येक भारतीयापर्यंत विकास पोहोचविणे हे होते. जम्मू- काश्‍मीर व लडाखबद्दल नुकत्याच झालेल्या एका कायद्यामुळे हे नागरिकही आता देशाच्या कायद्याचा हक्क बजावू शकतील. त्यांना शिक्षणाचा, माहितीचा, आरोग्याचा, आरक्षणाचा समान अधिकार इतर भारतीयांबरोबरच मिळेल. तोंडी तलाक प्रथेचा अभिशाप संपल्यामुळे तेथील माताभगिनींनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे,'' असे राष्ट्रपती म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article 370 Cancellation will open doors for progress: President