युगपुरूषाच्या आठवणी...

मृणालिनी नानिवडेकर 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अटलजी राजकारणी होते की कवी? की कवीमनाचे राजकारणी? वर्षे सरत गेली तरी ती वाक्‍ये आजही अंगावर काटा आणतात. अटलबिहारी वाजपेयी नावाचे भारतीय मध्यममार्गी मनावर गारूड करणारे व्यक्‍तीमत्व तेरा दिवसांचा कटू अनुभव पचवून पुन्हा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपच नव्हे तर या देशातला शहाणिव असलेला प्रत्येक माणूस हरखला.

पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे कुंपण ओलांडून एका इंग्रजी भाषेतल्या शब्दाप्रमाणे स्टेट्समनशी भेट झाल्याची जाणीव होत असे. पंतप्रधान पदावरील वाजपेयी, विरोधी पक्षातले वाजपेयी, सत्ता जवळपास फिरकलीही नव्हती तेव्हाचे वाजपेयी अशी कितीतरी चित्रे स्मृतीकोषात आहेत. 

vajpayee

सर्वप्रथम आठवणारा प्रसंग नागपुरातला. विधानभवनावर मोर्चा आयोजित केलेले आदिवासी गोवारी समाजाचे नेते चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले. 117 जण मागण्या मांडता मांडता इतिहासाचा भाग झाले. त्या घटना स्थळावर असलेल्या प्रत्येकाच्याच संवेदना गोठून गेल्या होत्या. त्या विशिष्ट ठिकाणी वृत्तांकन करताना 117 मृतदेह मोजून मन सुन्न झालेले असतानाच लगेचच अटलबिहारी वाजपेयी दु:खी परिवारांना भेट द्यायला येणार होते. तेव्हा तरुण भारतमध्ये काम करणारी मी आणि इंडियन एक्‍सप्रेसमधील संजय सूर्यदेवरा दोघेही वाजपेयींच्या या दौऱ्यात वृत्तांकनासाठी फिरत होतो. नागपुरातल्या निम्न मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये माना गोवारी समाजाची वस्ती. गल्लीगल्लीत ते जात होते. एका विशिष्ट घरात कुणीतरी वाजपेयीजींना सांगितले की, ही पत्रकार मुलगी घटनास्थळावर होती त्या वेळी. वाजपेयींनी लगेच स्थानिक भाजप नेत्याला तिला गाडीत बसवा सांगितले. वाजपेयी गाडीत बसताच काय झाले नेमके विचारू लागले. एकही प्रश्‍न न विचारता त्यांनी संपूर्ण कहाणी ऐकून घेतली. गोवारी समाजाचे नेते स्व. सुधाकर गजबे यांच्या गोपाळनगरातल्या घरी पोहोचल्यावरही ते केवळ ऐकत होते. त्या घरातून गाडीत बसताच ते म्हणाले : क्‍या लागा होगा गजबेजी को? कैसा दुर्भाग्य है ये? स्वरात कमालीचा ओलावा. दाटून उमटलेली ती दोनच वाक्‍ये, अख्ख्या दौऱ्यात फार तर ते आणखी दोन वाक्‍ये बोलले असतील. 

अटलजी राजकारणी होते की कवी? की कवीमनाचे राजकारणी? वर्षे सरत गेली तरी ती वाक्‍ये आजही अंगावर काटा आणतात. अटलबिहारी वाजपेयी नावाचे भारतीय मध्यममार्गी मनावर गारूड करणारे व्यक्‍तीमत्व तेरा दिवसांचा कटू अनुभव पचवून पुन्हा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपच नव्हे तर या देशातला शहाणिव असलेला प्रत्येक माणूस हरखला. मुंबई दौऱ्यावर आलेल्या या पंतप्रधानाची राजभवनात पत्रकारपरिषद होती. हो, ते पत्रकारांशी संवाद साधत, सत्तेतले अटलजी अधिकच अबोल झाले होते. उत्तर एखाद्या वाक्‍याचे असायचे. कुमुद संघवी चावरे यांनी प्रश्‍न विचारला तोच एका त्यांच्याच काव्यपंक्‍तीबददल. आप कवी है म्हणताच त्यांना थांबवत ते म्हणाले : तो कवितामेही पुछिये. कुमुद यांनी जनता रंक रहने देती है या आशयाची त्यांची कविता उच्चारत प्रश्‍न केला आता तर आपणच राजा झाला आहात, मग रंकांचे काय करणार? अटलजींनी तोच पॉज घेतला, त्यांचा सिग्नेचर पॉज. मग म्हणाले : आप कवी और राजा मे फरक दिखाना चाहती है? ऐसा मत करिये. मनावर पुन्हा शिक्‍कामोर्तब झाले ते अटलजींच्या वेगळेपणाचे. 

मग झाली अटलजींच्या गुडघ्यावरची शस्त्रक्रीया. मुंबईत अटलजी मुक्‍कामाला आलेले. बरे होताच पुन्हा पत्रकारांना सामोरे गेले. पाकिस्तानच्या कागाळ्या सुरू होत्या. काश्‍मिरचा काही भाग त्यांना हवा होता. आंतरराष्ट्रीय समुदायात वावरणारे अटलजी हा तोडगा स्विकारतील अशी चर्चाही सुरू झाली होती. जंग न होने देंगे या त्यांच्याच कवितेचा संदर्भ होताच. रूग्णालयाच्या आवारातच झालेली पत्रकारपरिषद. पाकिस्तानबददलचा प्रश्‍न विचारला जाताच ते काहीसे वैतागले. क्षणात या वैतागाची जागा संतापाने घेतली. शस्त्रक्रीयेने थकलेले वाजपेयी उत्तरले : कश्‍मीर भारत का अभिन्न अंग है. उसे कैसे कुछ होगा? केवळ एक वाक्‍य. सगळे प्रश्‍न संपले होते त्या विषयावरचे. मुंबईला विशेष निधी मिळावा यासाठी शिवसेना सतत मागणी करत असे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. वाजपेयी त्या प्रश्‍नावर उत्तर देताना म्हणाले : मुंबईची क्षमता महाप्रचंड आहे. विकासासाठी हे महानगर बळावर 
पैसा उभारू शकेल. बोलता बोलता ते अचानक रूग्णालयातून दिसलेल्या सुंदर पावसाचे उल्लेख करू लागले. ते कवी होतेच ना ... 

पुढचा प्रसंग नागपुरातला. जयललिता ममता सरकार खेचायच्या मूडमध्ये होत्या. भाजप सरकार अडचणीत होते. कुठल्याशा प्रवासावरून अटलजी नागपुरात येणार होते. त्यांचे नागपुरातील सुहृद राय कुटुंब विमानतळावर जाणार होते. पत्रकारही तेथे पोहोचले. रजनी राय अटलजींसाठी स्वीटकॉर्न सूप घेवून आल्या होत्या. पत्रकारांशी बोलण्याचा तो प्रसंग नव्हता. पण अटलजींनी आम्हाला टाळले नाही. सूप आणलेय ना असा विचारून ते समोरच्या वाटीकडे बघत होते. सरकारचे काय होणार असा प्रश्‍न पुढे येताच ते हसत म्हणाले : एव्हरीबडी इज न द सूप. दोन चमचे पोटात जाताच हात जोडून निघून गेले. 

संघ कार्यालयात अटलजींच्या भेटी असायच्या. संबंधात कमालीचे तणाव आले होते. भाजप आणि संघाची भाषा वेगळी होत होती. आर्थिक नितीवर टीका सुरू होती. ब्रजेश मिश्रे लक्ष्य झाले होते. त्यातच अचानक तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीचा माहोल होता. जयललिता जोरात होत्या. करूणानिधींचा त्या वेळी भाजपला पाठिंबा होता. वृत्तसंकलनासाठी फिरत असताना करूणानिधी परिवाराची हार होणार हे दिसत होते. वाजपेयींची करुणानिधींसह संयुक्‍त सभा होती. मरीना बीच गर्दीने फुलून गेला होता. दोघेही पट्टीचे वक्‍ते. अटलजींचे भाषण भाषांतरीत करून सांगितले जात होते. प्रतिसाद जोरात होता. आज महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे सी. विद्यासागर राव त्या वेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री होते. त्यांच्या भेटीसाठी अटलजी विमानतळाच्या विशेष कक्षात आले. निकाल काय लागताहेत याची कल्पना उपस्थितांनी दिल्यावर अटलजी म्हणाले : मित्रपक्ष के लिए ये सब सेहन करना पडेगा. 

vajpayee

त्यानंतर शायनिंग इंडियाची वावटळ पक्षाला बसवून गेली. चिंतन बैठक मुंबईत झाली त्यावेळी अटलजी कुठेतरी हरवले होते. त्यांना प्रिय असलेल्या प्रमोद महाजनांचा मुंबईत त्यांनी माझा लक्ष्मण म्हणून उल्लेख केला होता. त्यांचा करूण अंत झाला. मग अटलजीही विकल झाल्याच्या बातम्या येवू लागल्या. ''काल के कपाल पे लिखता मिटाता हूं'' अशी ग्वाही देणारा हा युगपुरूष थकला होता. भारतीय राजकारण बदलत होते. अडवाणी सार्वजनिक जीवनात सक्रीय होते पण अटलजी इतिहासात हळुहळू लोप पावत होते. त्यांची यात्रा पूर्ण झाली. कारगिलच्या वेळी त्यांना काय वाटले, कंदहार अपहरण वेगळ्या पद्धतीने हाताळता आले नसते काय, त्यांना शायनिंग झाकोळणार याची भीती वाटत असतानाही त्यांनी मतदानास सामोरे जाण्याचा मार्ग का निवडला, असे अनेक प्रश्‍न मात्र तसेच आहेत. नव्या परिस्थितीत हे प्रश्‍न विचारायचे नाहीत अशी वृत्ती बळावणार का ही खंतही दाटून येतेच आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on atal bihari vajpayee by mrinalini naniwadekar