मी खरंच दहशतवादी आहे? 

गुलजार गोलंदाज 
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

'हर मुसलमान आतंकवादी नहीं होता. मगर, हर आतंकवादी मुसलमान क्‍यों होता है?' असा प्रश्‍न यापूर्वी कानावर यायचा. आता थेट 'हर मुसलमान आतंकवादी होता है', असा शिक्का मारून 'भ्रष्टबुद्धीवादी' मोकळे होत आहेत. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर अशा धार्मिक दहशतवादाने वेग घेतला आहे. त्यामुळे सातत्यानं मनात एकच प्रश्‍न येतोय... खरंच मी दहशतवादी आहे? असे अनेक 'मी' आहेत देशभर... त्या सर्वांच्याच मनातला हा प्रश्‍न... 

14 फेब्रुवारीचा तो दिवस देशाला हादरवणारा ठरला. पुलवामा इथं आदिल दर या दहशतवाद्यानं 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनं संपूर्ण देश शोकसागरात बुडालं. सर्वत्र संताप आणि बदल्याची भावना आहे. राजकारणात एकमेकांची उणी-धुणी काढणारे सर्वपक्षीय नेतेही एकवटले. साऱ्यांनी मोठ्या ताकदीनं दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा निषेध केला. देशावर ज्या-ज्या वेळी अशी संकटं येतात, संपूर्ण देश एकसंघ उभा राहतो. या वेळीही तेच चित्र दिसलं; मात्र काही विघ्नसंतोषी जाती-धर्माचे रेघोटे ओढून या चित्रातील 'एकता'चं विभाजन करू पाहत आहेत. 100 टक्के 'सामाजिक' न राहिलेल्या समाज माध्यमावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्या की संताप होत नाही; पण कीव करावीशी वाटते अशा लोकांची. 

'...हर आतंकवादी मुसलमान क्‍यों होता है?' हा प्रश्‍न लहानपणापासूनच कानावर येत होता. तेव्हा संतापही व्हायचा. मग, हा संताप क्रिकेटच्या एखाद्या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली की तेवढ्यापुरता शांत व्हायचा. मग, दुसऱ्या सामन्याची प्रतीक्षा असायची. पाकिस्तानातून दहशतवादी कारवायांना खतपाणी घातलं जातं आणि तिथल्या मुसलमान दहशतवाद्यांमुळंच आपल्या देशातील मुसलमान बदनाम होत आहेत, ही चीड लहानपणापासून मनात कायम होती. नंतर पुढे समजत गेलं की दहशतवाद्यांचा कोणताही "धर्म' नसतो. त्यामुळे अपराधीपणाची भावना मनातून दूर होत गेली. कदाचित त्यामुळंच मित्रांचा गोतावळा तयार होत असताना कधीही 'धर्म' आडवा आला नाही. 

जातीय दंगल सोडाच, साधा जातीय तंटाही माझ्या गावात कधी पाहिला नाही. सणासुदीत कधीही 'धार्मिक रंग' गावाला शिवला नाही. होळीच्या काळात मोहल्ल्यात आमच्या माता-भगिनी अंगण सारवतात. श्री देव केदारनाथची पालखी मोहल्ल्यात घरोघरी फिरते, डोक्‍यावर पदर घेऊन मुस्लिम भगिनी पालखीचं स्वागत करतात, पूजा-अर्चा करतात. हिंदू धर्मातील मानकऱ्यांच्या उपस्थितीशिवाय गावात मोहरमची मिरवणूक सुरू होत नाही. दिवाळीचा फराळ इथं घरोघरी वाटला जातो. ईदच्या दिवशी हिंदूधर्मीय मोहल्ल्यातील आपल्या मित्रांच्या घरी तितक्‍याच उत्साहानं जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे (ता. चिपळूण) या गावचं हे प्रातिनिधिक उदाहरण. हे चित्र देशभर अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. 

 

मला आठवतंय... ईदच्या दिवशी वडिलांचा एखादा मित्र घरी आला नाही, म्हणून शिरखुर्म्याच्या डब्यांचे पार्सल घेऊन आम्ही भावंडं उत्साहानं निघायचो. या साऱ्या गोष्टी अनेक वर्षांपासून निरंतर सुरू आहेत. मग, मुसलमान मुलांच्या मनात बालपणापासूनच कट्टरताचं विष पेरलं जातं, असं 'म्हणणं' आणि 'मानणं' कितपत योग्य वाटतं? शालेय शिक्षण घेतानाच धार्मिक मूल्यांचं, पवित्र कुराणाचं शिक्षण घेण्यासाठी मीही मदरसामध्ये जायचो; पण दुसऱ्या धर्माबद्दल मनात चीड, सूडभावना निर्माण करणारे संस्कार ना आमच्या मौलांनांनी आम्हाला दिले, ना ही कधी आमच्या घरात जाती-धर्माच्या सीमांची ओळख आम्हाला करून देण्यात आली. नमाज पठणासाठी मी आतापर्यंत ज्या-ज्या मशिदीत गेलो, तिथं कोणत्याही मौलवींनी धार्मिक भावना भडकावणारी भाषणं मशिदीत केल्याचं मला आठवत नाही. या संस्कारांमुळंच कदाचित आम्ही तरुणांनी मोहल्ल्यात स्थापन केलेली 'लब्बैक कमिटी' जाती-धर्मापलीकडचं गावातलं उत्तम व्यासपीठ बनू शकली. 'दहशतवाद' आणि 'दहशतवादी' या दोन शब्दांची व्याख्या बालवयातच कळली म्हणून बरं झालं. नाहीतर, समाज माध्यमांवर 'बेफाम' झालेल्या सध्याच्या 'धर्मवेड्यां'मध्ये कदाचित माझ्यासारखा आणखी एक वेडा 'सामील' (इथे "सहभागी'ऐवजी 'सामील' हा शब्द मुद्दाम वापरलाय.) झाला असता. 

'हर मुसलमान आतंकवादी होता है' अशा बेफाम प्रतिक्रिया देणाऱ्यांचं म्हणणं खरं असंल, तर पुलवामात शहीद झालेल्यांमधला कमांडर नासीर अहमद कोण समजायचा? त्याचा आणि आतापर्यंत देशासाठी बलिदान देणाऱ्या हुताम्यांचा हा अपमान नव्हं का? देशाच्या प्रगतीत मोलाची कामगिरी करणाऱ्या मुस्लिम समाजातील थोर पुरुषांचा हा अपमान नव्हं का? सीमेवर प्राणांची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांमधल्या मुसलमान जवानांचा हा अपमान नव्हं का? बेफाम प्रतिक्रिया देऊन दहशतवादाला खतपाणी घालणारे आपणच खरे सामाजिक दहशतवादी नाहीत का? मी आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनात हे प्रश्‍न आहेत. त्याची उत्तरेही आहेतच. त्यामुळेच कदाचित अशा प्रतिक्रिया केवळ समाज माध्यमांपुरत्याच मर्यादित राहतात. 
 

'दहशतवाद्यांना घरात घुसून ठोका' हीच भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. आपले जवान त्यासाठी समर्थ आहेत; पण हे करताना दुसरीकडे आपल्याच घरात सामाजिक दहशतवाद शिजणार नाही, याची जबाबदारी देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे. देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज लागत नाही. त्यामुळे वादग्रस्त विधानांना, पोस्टना, कमेंट्‌सना भीक न घालता देश एकसंघ ठेवूया. हीच खरी देशभक्ती ठरेल, शहिदांना हीच खरी आदरांजली ठरेल. 

( guljar.golandaj@esakal.com )
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on pulwama terrorist attack reactions on social media