विस्तारवादाचे युग आता संपले असून ही वेळ विकासवादाची आहे

Narendra-Modi
Narendra-Modi

भारत, चीन आणि पाकिस्तान या देशांना परस्परांचा भूप्रदेश हवा आहे. पण त्यादृष्टीने सुरू असलेले या देशांचे प्रयत्न नक्कीच फसतील कारण दुसऱ्याचा विनाश केल्याशिवाय असा भूप्रदेश मिळवणे शक्‍य नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला शुक्रवारी (ता. ३) दिलेल्या भेटीत लष्कराच्या जवानांशी बोलताना चीनचे नाव न घेण्याची काळजी घेतली. पण ‘विस्तारवादाचे युग आता संपले असून ही वेळ विकासवादाची आहे,’ असे त्यांनी कुणाला उद्देशून ठासून सांगितले याचा सहज अंदाज येण्यासारखा आहे. हे सारे ते चीनबद्दल बोलत होते. मात्र, थोडा विचार केला तर व्यावहारिक शहाणपणाचा हा सल्ला पाकिस्तान आणि अगदी भारतालाही लागू पडतो. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वातील चीनच्या विस्तारवादाची जगाने दखल घेतली आहे.

चीन सगळ्याच शेजाऱ्यांशी सागरी व भूप्रदेशीय सीमांवर भिडल्यामुळे जागतिक महासत्तांच्या डोकेदुखी वाढली आहे. भारताप्रमाणे चीनलाही त्याच्या गौरवशाली इतिहासाचे रंजन आवडते. भारताला जशी अखंड भारत तसेच मौर्य वा गुप्त या राजवंशांच्या काळाची भूरळ आहे तशीच चीनला क्विंग राजवंशाच्या काळात झालेल्या विस्ताराची आहे. तथापि, फरक एवढाच आहे की अखंड भारत हे ज्यांचे स्वप्न आहे अशा एकमेव राजकीय पक्षाचे सरकार भारतात असले तरी लोकशाहीत सत्ता परिवर्तन होत असते. चीनमध्ये विस्तारवादाची भूमिका असलेल्या पक्षाचे सरकार आहे आणि हा पक्ष सदैव सत्तेत राहणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रदेश काबीज करण्याचे परिणाम
या पार्श्‍वभूमीवर लडाख हा फार छोटा विषय आहे. मोठा मुद्दा आहे तो अरुणाचल प्रदेशच्या ८३ हजार चौरस किलोमीटर भूप्रदेशाचा. या प्रदेशावर बळजबरीने काबीज करण्याचा त्यांचा विचार असेल तर त्यांनी आपले डोके तपासून बघावे. एकविसाव्या शतकात असे घडणे शक्‍य नाही. पंतप्रधानांनी विस्तारवादाच्या विरोधात दिलेला सल्ला आपल्याला उद्देशून आहे असा चीनचा समज झाला असला तरी हा सल्ला पाकिस्तानला असू शकतो. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर या देशाने आपण भारताकडून संपूर्ण जम्मू-काश्‍मीर हिसकावून घेऊ शकतो या विचारात सात दशकांचा काळ घालवला. या काळात त्यांना आपल्या देशाचा मोठा भूप्रदेश गमवावा लागला. परंतु, ते मागे हटले का? आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात सारी शक्ती पणाला लावल्याने हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. १९९० मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर असताना माझे कवी मित्र हबीब जालीब यांनी सुंदर ओळी लिहिल्या होत्या. त्या अशा ‘नशिली आँखो, सुनहरी जुल्फों के देश (बांगलादेश) को खो कर, मै हैरान हू वो जिक्र वादी-ए-कश्‍मीर करते है’

इस्त्राईल - पाकिस्तानमधील फरक
युद्धानंतरच्या जगाने विशिष्ट विचारसरणीवर आधारित अस्तित्वात आलेल्या इस्राईल आणि पाकिस्तान या दोन नव्या देशांचा उदय बघितला. इस्राईल हा ज्यूंना दिलेल्या वचनाचा भूप्रदेश बनला तर भारतीय उपखंडातील मुस्लिमांसाठी ‘इस्लामचा गड’ म्हणून पाकिस्तान अस्तित्वात झाला. इस्राईल हा देश काही परिपूर्ण नाही. पण त्याची पाकिस्तानशी तुलना करून बघा. या दोन्ही देशांचा प्रवास साधारणपणे एकाच वेळी लोकशाहीच्या मार्गावर सुरू झाला. प्रारंभीच्या काळात दोन्ही देश अमेरिका आणि पाश्‍चिमात्यांच्या गळ्यातील ताईत होते. आज राजकीय, आर्थिक  आणि सामाजिक आघाड्यांवर हे देश कुठे आहेत बघा. पश्‍चिम किनारपट्टीवरील ताब्याचा मुद्दा सोडल्यास इस्राईलने अन्य सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत. परंतु, हा मुद्दा पाकिस्तानच्या काश्‍मीरच्या मुद्‌द्‌यापेक्षा वेगळा आहे. 

स्वप्नातील सीमा कल्पनेतच बऱ्या
आता भारताकडे वळू. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७० वर्षांमध्ये आपल्या देशाला एक इंचही भूमी मिळवता आलेली नाही. चार मोठी युद्धे, अनेक लहान लढाया लढूनही आपल्याला हे शक्‍य झाले नाही. १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये काबीज केलेल्या भूप्रदेशावरील ताबा आपल्याला सोडून द्यावा लागला. तसेच यानंतरही घडू शकते. ९६२ मध्ये चीनलाही त्याने पूर्वेकडे बळकावलेल्या जवळपास सर्व प्रदेशावरील तर पश्‍चिमेला लडाखचा काही भाग सोडला तर अन्य भागावरील ताबा सोडावा लागला होता. भारताच्या नकाशावर असलेल्या पण चीन आणि पाकिस्तानच्या ताब्यातील इंचन इंच जागा परत मिळविण्याचा निग्रह भारतीय संसदेने व्यक्त केला आहे. यावर आपण ठाम आहोत.

भारत, चीन आणि पाकिस्तान या तिन्ही शेजाऱ्यांना दुसऱ्याचा भूप्रदेश हवा आहे जो त्यांना आपला वाटतो. सैनिकी बळावर चीन अरुणाचल प्रदेश आपल्या ताब्यात घेऊ शकतो का? किमान तवांग हा जिल्हा? श्रीनगरच्या राजभवनावर आपल्या देशाचा झेंडा फडकताना पाकिस्तान बघू शकतो का ? आणि भारत अक्‍साई चीन, मुजफ्फराबाद गिलगिट-बाल्टिस्तान परत घेऊ शकतो का ? हे अशक्‍य आहे असे नाही. पण दुसऱ्या देशाचा संपूर्ण निःपात केल्याशिवाय हे जमण्यासारखे नाही. अण्वस्त्रांचा साठा असलेल्या या मोठ्या देशांमधील युद्धात एकाचीच सरशी होईल, अशी अपेक्षा कशी करता येईल ? त्यामुळे या देशांच्या स्वप्नातील सीमा कल्पनेतच बऱ्या आहेत.

(अनुवाद - किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com