जेटलींची शेरोशायरी अन्‌ नाराज विरोधक

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- लोकसभेचे वर्तमान सदस्य (सिटिंग मेंबर) असलेले ई. अहमद यांच्या निधनामुळे कामकाज तहकूब करावे, अशी जोरदार मागणी करणारे विरोधक, त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावून झालेले अर्थसंकल्प सादरीकरण आणि संसदीय परंपरांची मोडतोड, ही अमानुष व अमानवी असल्याची टीका करणारे; पण फारच कमी संख्येने असलेले विरोधक. रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाल्यानंतरचा पहिला व ऐतिहासिक अर्थसंकल्प आज सादर होताना लोकसभेत हे वातावरण दिसले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला तोच असा विरोधाभासी वातावरणात.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पावणे अकराच्या सुमारास जेटली संसदेच्या आवारात पोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच सुमारास संसदेत हजर होते. आज लोकसभेत भाजपच्या बाकांवर लक्षणीय संख्या असली तरी, उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणूक ज्वरामुळे त्या राज्यातील अनेक खासदार आज आले नव्हते. प्रेक्षक गॅलऱ्या नेहमीसारख्या गच्च भरल्या होत्या. राज्यसभा सदस्यांचीही गॅलरी भरलेली होती.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर काल सेंट्रल हॉलमध्येच हृदयविकाराच्या झटक्‍याने कोसळलेले माजी परराष्ट्रमंत्री ई. अहमद यांचे निधन झाल्याचे आज मध्यरात्री अडीचला रुग्णालयाने जाहीर केले. अहमद यांना जीवनरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. आज कामकाज तहकुबीची मागणी करणाऱ्या विरोधकांनीही हाच मुद्दा मांडला. कॉंग्रेस सदस्यांसह माकपचे महंमद सलीम व आसामचे बद्रुद्दीन अहमद यांनीही अर्थसंकल्प आज सादर न करण्याची व सदस्याचे निधन झाल्यास कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची मागणी केली. मात्र, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यास नकार दिला. यामुळे डाव्या खासदारांनी सभात्याग केला.

जेटली यांनी 46 पानी भाषण वाचताना स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांची वचने व शेरोशायरीची पखरण केली. योजनांचा निधी वापरण्याबाबत त्यांनी कॉंग्रेसला जबरदस्त टोमणा मारून प्रत्युत्तर दिले. जेटली यांनी दोन शेर उधृत केले. त्यातील एका शेरची अखेरची ओळ "हम आगे आगे चलते हैं, आ जाइए आप,' अशी होती. विरोधी बाकांवरून, "आप आप क्‍या कह रहे हैं जेटली जी?', असा खोचक सवाल आला. जेटली यांनी वाचलेला दुसरा शेर असा ः
नई दुनिया है, नया दौर, नई उमंग । कुछ थे पहले के तरीके, तो हैं कुछ आज के ढंग।
रोशनी आ के अँधेरों से जो टकरायी है। काले धन को भी बदलना पडा आज अपना रंग।
यात त्यांनी "काले बादल' ऐवजी "काला धन' हा बदल केला. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पत्रकारांनी याबाबत विचारले असता जेटली यांनी, असे शीघ्रकाव्यात बदल करावाच लागतो, असे हसत-हसत सांगितले.

पत्रकारांची पुन्हा अडवणूक
अर्थसंकल्पाच्या दिवशी प्रसारमाध्यमकर्मींना संसदेत वेळेत पोचण्यास अडथळे येतील, असेच सुरक्षा यंत्रणेचे वर्तन होते. या यंत्रणेने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सर्वसामान्यांसाठी असलेले प्रवेशद्वार बंद केले. यामुळे पत्रकार, मंत्रालय अधिकारी मंत्र्यांचे सहायक आत जातात, त्या अरुंद मार्गिकेवर प्रचंड गर्दी होऊन रेटारेटी सुरू झाली. अनेक ज्येष्ठ संपादक व पत्रकारही यात दहा मिनिटांपासून अर्धा तास अडकून पडले होते. त्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. मात्र, संसदीय सुरक्षा यंत्रणेने आडमुठेपणा कायम ठेवला.

Web Title: arun jaitley and budget 2017