व्हिसा धोरणाबाबत जेटलींकडून चिंता व्यक्त 

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंधांत झालेल्या सुधारणेबाबत जेटली यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे आर्थिक संबंध दृढ होऊन अनेक नव्या संधी निर्माण होत असल्याचे जेटली म्हणाले.

वॉशिंग्टन - एच-1बी व्हिसाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेल्या नव्या अध्यादेशाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारताला वाटणारी काळजी अमेरिकेकडे व्यक्त केली आहे. व्हिसा धोरण अधिक कडक करण्याचा या अध्यादेशाचा उद्देश असल्याचे भारताचे म्हणणे आहे. 

जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या वार्षिक बैठकांवेळी जेटली यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन नुचिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या अभियंत्यांना आवश्‍यक असणाऱ्या एच-1बी व्हिसाबाबतच्या अमेरिकेच्या धोरणाबाबत काळजी व्यक्त केली. भारतीय अभियंत्यांनी अमेरिकेच्या विकासात बजावलेल्या मोलाच्या भूमिकेचाही जेटली यांनी या वेळी उल्लेख केला. 

गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधील संबंधांत झालेल्या सुधारणेबाबत जेटली यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे आर्थिक संबंध दृढ होऊन अनेक नव्या संधी निर्माण होत असल्याचे जेटली म्हणाले. जेटली आणि नुचिन यांच्यामध्ये दहशतवादाबाबतही चर्चा झाली. याबाबत भारताने केलेल्या कामगिरीचे नुचिन यांनी कौतुक केले. 

Web Title: Arun Jaitley raises H-1B visa issue with US authorities