केजरीवालांचा मुक्काम तिसऱ्या दिवशीही नायब राज्यपालांच्या कार्यालयात

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

दिल्लीतील समस्या दूर व्हाव्यात, चार महिन्यांपासून सुरू असलेला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संप मागे घेतला जावा, कामबंद आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, घरपोच रेशन योजनेला नायब राज्यपालांनी मान्यता द्यावी, अशा मागण्या आपच्या आहेत. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीन मंत्री हे गेले तीन दिवसांपासून दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत आहेत. सोमवारी (ता. 11) संध्याकाळ पासून चालू असलेले हे धरणे राजनिवासाच्या प्रतिक्षाकक्षात अजूनही सुरू आहे. 

केजरीवालांसह उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गृहमंत्री सत्येंद्र जैन, कामगार मंत्री गोपाळ राय हे ही राजनिवासात धरणे करत आहेत. दिल्लीतील समस्या दूर व्हाव्यात, चार महिन्यांपासून सुरू असलेला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संप मागे घेतला जावा, कामबंद आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, घरपोच रेशन योजनेला नायब राज्यपालांनी मान्यता द्यावी, अशा मागण्या आपच्या आहेत. 

केजरीवालांनी 'दिल्लीच्या जनतेच्या हक्कासाठी व विकासासाठी आम्ही मोठा संघर्ष करण्यास तयार आहेत' असे ट्विट केले आहे. तसेच सत्येंद्र जैन हे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचेही केजरीवालांनी ट्विटद्वारे सांगितले. सोमवार नंतर राज्यपाल बैजल हे कामकाजात व्यस्त असल्याने केजरीवाल व इतर सहकाऱ्य़ांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी या मागण्यांचे पत्र पुन्हा एकदा स्वाक्षऱ्यांसह राज्यपालांनी पाठवले आहे. त्यामुळे दिल्लीचे राज्य सरकार विरूद्ध नायब राज्यपाल हा संघर्ष तीव्र होताना दिसतोय.      
 

Web Title: Arvind Kejriwal and 3 ministers in lg house for demands