जेटलीजी, खरंच सॉरी! : केजरीवाल यांचा नवा माफीनामा

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

नवी दिल्ली : बेछूट आरोपांबद्दल माफी मागावी लागत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आम आदमी पार्टी'चे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे माफीनामा पाठविला आहे. केजरीवाल यांच्यासह 'आप'चे वरिष्ठ नेते संजयसिंह, राघव चड्ढा आणि आशुतोष यांनीही जेटलींची माफी मागितली आहे. 

नवी दिल्ली : बेछूट आरोपांबद्दल माफी मागावी लागत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आम आदमी पार्टी'चे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे माफीनामा पाठविला आहे. केजरीवाल यांच्यासह 'आप'चे वरिष्ठ नेते संजयसिंह, राघव चड्ढा आणि आशुतोष यांनीही जेटलींची माफी मागितली आहे. 

'आप'च्या या चार वरिष्ठ नेत्यांनी जेटली यांच्याकडे एक संयुक्त माफीनामा पाठविला आहे. 'दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असताना जेटली यांनी भ्रष्टाचार केला होता', अशा आशयाचा आरोप 'आप'च्या नेत्यांनी केला होता. यामुळे जेटली यांनी केजरीवाल यांच्यासह 'आप'च्या इतर नेत्यांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. 

'या प्रकरणातील खरी माहिती असल्याचे भासवून काही जणांनी माझ्यासमोर भ्रष्टाचारासंदर्भातील कागदपत्रे सादर केली होती. त्यावरून मी असे आरोप केले होते. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचे नुकतेच निदर्शास आले आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे असे आरोप झाले', असे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे. 'आम्ही जेटली यांच्याविरोधातील सर्व आरोप मागे घेत आहोत', असेही 'आप'ने स्पष्ट केले आहे. 

माफीनाम्याचे सत्र..! 
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून पुढे आलेल्या 'आप'च्या नेत्यांनी गेल्या काही काळात अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यातील बहुतांश जणांनी मानहानीचे खटलेही दाखल केले. त्यानंतर केजरीवाल यांनी अनेकांची माफी मागितली. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या या माफीनाम्याच्या सत्रात केजरीवाल यांनी आतापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल आणि अकाली दलाचे नेते विक्रमसिंह मजिठिया यांची माफी मागितली आहे. 

आम्ही इथे 'इगो'साठी लढत नाही. जनतेसाठीच काम करत आहोत. आमच्या कृत्याने किंवा वक्तव्याने कुणी दुखावले गेले असेल, तर आम्ही माफी मागू! न्यायालयात जाऊन लढत बसण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा जनतेची कामे करण्यास आमचे प्राधान्य आहे. 
- मनीष सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री 

Web Title: Arvind Kejriwal and AAP leaders tenders apology to Arun Jaitley