मारहाणीच्या वृत्ताचा ओवेसींकडून इन्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

नवी दिल्ली: "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्याने आज संसद भवनाच्या परिसरात मारहाण केल्याची चर्चा रंगली होती. संबंधिताने तसा दावा केला असला तरी, असा कोणताही प्रकार घडल्याचा ओवेसी यांनी "सकाळ'शी बोलताना इन्कार केला. तसेच कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असलेल्या संसदेच्या परिसरात अशा प्रकाराची नोंद नसल्याचे संसदेच्या सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले.

संसदेच्या वाहनतळ भागात ओवेसी यांना दुपारी एका आगंतुकाकडून मारहाण झाल्याची बातमी पसरली. संबंधित व्यक्ती, हेमंत गोडसे यांचा नाशिक येथील कार्यकर्ते गोरख खर्जुल असल्याचेही कळाले. गोडसे यांच्या स्वीय सहायकासमवेतच खर्जुल हा संसदेचे कामकाज पाहण्यासाठी आला होता. ओवेसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आपण हे कृत्य केल्याचा दावा त्याने केला आहे. या कथित प्रकरणानंतर तो गोडसे यांच्या निवासस्थानी होता; परंतु हेमंत गोडसे यांनी या घटनेबाबत कानावर हात ठेवले. आपण दुपारी तीनला दिल्लीत पोचलो असल्यामुळे या प्रकाराची माहिती नाही; परंतु असे काही घडले असेल तर ते गैर आहे. अशी मारहाण निषेधार्ह असून लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे, असे गोडसे यांनी सांगितले.

दुसरीकडे, ओवेसी यांनीही मारहाणीचा दावा फेटाळला. निवासस्थानी जाण्यासाठी आपण वाहनतळावर पोचलो असता एका व्यक्तीने रस्ता अडवून अपशब्द बोलत हुज्जत घालणे सुरू केले. संसद भवनाच्या आवारात खासदाराने असे वाद घालणे योग्य दिसत नसल्याने त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून आपण गाडीत जाऊन बसलो. मात्र, त्या व्यक्तीने पुन्हा गाडीसमोर येण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला चुकवून आपण संसदेच्या आवारातून बाहेर पडलो. मारहाण झालेली नाही, असे ओवेसी यांनी सांगितले, तर सुरक्षा यंत्रणांनीही अशा घटना निदर्शनास आली नसल्याचे सांगितले.

Web Title: Asaduddin Owaisi says not beat