गोडसेची पिलावळ मला गोळ्या घालेल - असदुद्दीन ओवेसी

वृत्तसंस्था
Thursday, 15 August 2019

काश्‍मीर खोऱ्यामध्ये सध्या आणीबाणीसदृश स्थिती असून, केंद्र सरकारचे फक्त काश्‍मीरमधील जमिनीवर प्रेम असून, त्यांना जनतेशी काही देणेघेणे नाही. सध्या देशात नथुराम गोडसेची पिलावळ जिवंत असून, उद्या कुणीही माझ्यावर गोळी झाडू शकतो, अशी भीती "एमआयएम'चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

हैदराबाद - काश्‍मीर खोऱ्यामध्ये सध्या आणीबाणीसदृश स्थिती असून, केंद्र सरकारचे फक्त काश्‍मीरमधील जमिनीवर प्रेम असून, त्यांना जनतेशी काही देणेघेणे नाही. सध्या देशात नथुराम गोडसेची पिलावळ जिवंत असून, उद्या कुणीही माझ्यावर गोळी झाडू शकतो, अशी भीती "एमआयएम'चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

या वेळी ओवेसी यांनी मोदी आणि शहांचे कौतुक करणारे सिनेस्टार रजनीकांत यांच्यावरही टीका केली. जम्मू आणि काश्‍मीरमधील 370वे कलम रद्द केल्याने रजनीकांत यांनी मोदी आणि शहा यांना कृष्ण आणि अर्जुनाची उपमा दिली होती. मग यात कौरव आणि पांडव कोण आहेत, हे तरी आम्हाला सांगा. तुम्हाला देशामध्ये महाभारत घडवायचे आहे का, असा सवालही त्यांनी केला. जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आणीबाणी नसेल, तर लोकांना घराबाहेर का पडू दिले जात नाही. सध्या ज्या नेत्यांना कैद करण्यात आले आहे; त्यांची तातडीने सुटका केली जावी. केंद्राने घटनाबाह्य पद्धतीने काश्‍मीरमधील 370वे कलम रद्द केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया....
मला माहिती आहे, की भाजप सरकारचे फक्त काश्‍मीरमधील जमिनीवरच प्रेम आहे, त्यांचे ताकदीवर प्रेम आहे; पण न्यायावर नाही. भाजपला फक्त ताकद मिळवायची आहे. सरकारने काश्‍मीरमधील निर्बंध हटवावेत. तेथील दूरध्वनी सेवा का बंद आहे? काश्‍मीरमधील लोक खरोखरच आनंदी असतील, तर त्यांना घरातून बाहेर येऊ द्यावे.
- असदुद्दीन ओवेसी, नेते एमआयएम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: asaduddin owaisi talking