ओवेसींनी भाजपला जिंकवले- दिग्विजयसिंह

टीम ई सकाळ
सोमवार, 13 मार्च 2017

लोकांच्या शक्तीवर पैशाच्या बळाने गोव्यात विजय मिळविला आहे. येथे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा आम्ही मिळवू शकलो नाही, त्याबद्दल मी गोव्याच्या लोकांची माफी मागतो.

- दिग्विजयसिंह

पणजी : 'असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-इ-मुस्लिमीन हा पक्ष उत्तर प्रदेशात एकही जागा जिंकू शकला नाही. ते जिंकले नाहीत, मात्र त्यांनी भाजपला जिंकायला मदत केली,' असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी सांगितले. 

"लोकांच्या शक्तीवर पैशाच्या बळाने गोव्यात विजय मिळविला आहे. येथे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा आम्ही मिळवू शकलो नाही, त्याबद्दल मी गोव्याच्या लोकांची माफी मागतो," असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. 

भारतीय जनता पक्षाला गोव्यात बहुमत मिळालेले नाही. मात्र, तरीही विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याच्या अटीवर इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, पर्रीकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले असून, उद्या (मंगळवारी) बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

गोव्यात भाजपने आमदारांचा घोडेबाजार केला असल्याचे दिग्विजयसिंह यांनी काल म्हटले होते. त्यांनी आज (सोमवार) ट्विटच्या माध्यमातून येथे अर्थसत्ता जिंकल्याचे म्हटले आहे.
'परंतु, जातीय शक्ती आणि पैशाच्या बळावर गोव्यात केल्या जाणाऱ्या राजकारणाच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील,' असे दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे.

'आप'चे सर्वेक्षण...
तसेच, आम आदमी पक्षाच्या सर्वेक्षणात 'आप'ला 36%, भाजपला 26% आणि काँग्रेसला 19% मते मिळतील असा दावा केला होता. मात्र आपने तिथे एकही जागा जिंकली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 

Web Title: Asaduddin Owaisi's AIMIM helped BJP to win