पैशांची माया अन्‌ नेत्यांचा वरदहस्त ; आसारामची संपत्ती दहा हजार कोटींच्या घरात

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आसाराम बापूच्या निकटवर्तीयांना त्याची भोंदूगिरी आधीच माहिती होती, पण राजकीय वरदहस्त असल्यामुळे कोणीच त्याविरोधात उघडपणे बोलत नव्हते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचा विशेष संपर्क होता. 

नवी दिल्ली : आध्यात्माचा डांगोरा पिटत आसाराम बापूने तब्बल दहा हजार कोटी रुपयांचे साम्राज्य उभारले असून, भारत आणि अन्य देशांतील आसारामच्या आश्रमांची संख्या चारशेपेक्षाही अधिक आहे.

आसाराम बापूच्या निकटवर्तीयांना त्याची भोंदूगिरी आधीच माहिती होती, पण राजकीय वरदहस्त असल्यामुळे कोणीच त्याविरोधात उघडपणे बोलत नव्हते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचा विशेष संपर्क होता. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह देखील बापूंचे शिष्य होते, विद्यमान गृहमंत्री राजनाथसिंह देखील कधीकाळी आसाराम बापूच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत असत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या वसुंधराराजे, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांच्याप्रमाणेच कॉंग्रेसचे नेते कमलनाथ, कपिल सिब्बल, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आदी मंडळींचा आसाराम बापूच्या शिष्यसंप्रदायामध्ये समावेश होता.

मध्यंतरी जोधपूर न्यायालयामध्येच सिक्कीम उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुंदरनाथ भार्गव यांनी आसाराम बापूचे पाय धरल्याने नवा वाद निर्माण झाला होता. 

काँग्रेसची ट्विटरवरून टीका 

आसाराम बापूला लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर कॉंग्रेसने तातडीने ट्विटरवर मोदींचा बापूंसोबतचा व्हिडिओ पोस्ट केला. यानंतर काही यूजर्संनी ट्विटरवर दिग्विजयसिंह आणि आसारामबापूंची छायाचित्रे व्हायरल करून नव्या वादाला तोंड फोडले. यावर अभिनेता फरहान अख्तरने युजर्संची चांगलीच फिरकी घेतली. आसाराम दोषी ठरण्यापूर्वीची त्याची नेत्यांसोबतची छायाचित्रे शेअर करू नका, असे खडे बोलच त्याने सुनावले. 

लहरी आसाराम 

आसाराम बापूच्या तुरुंगातील वर्तनाने पोलिसही वैतागले आहेत, कधीकधी आसारामला अचानक लहर येते आणि तो गाणे म्हणत नाचू लागतो. काही शिष्य त्याला बाहेरून डबा पाठवितात, त्यामध्ये चॉकलेटपासून सुकामेव्यापर्यंत सर्वच घटकांचा समावेश असतो. मध्यंतरी एका हिंदी दूरचित्रवाणी वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आसारामच्या कामलिला उघड झाल्या होत्या. न्यायालयाने या स्टिंग ऑपरेशनचा पुरावा म्हणून स्वीकार केला. 
 

Web Title: Asaram bapu Property Approximately 100000 crores