"संरक्षिले अंतराळ' उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी 

"संरक्षिले अंतराळ' उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी 

नवी दिल्ली ः अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्याची सिद्धी भारताने बुधवारी साध्य केली. याद्वारे "अंतराळातील महासत्ता' हा किताब दिमाखात पटकावला. अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मोहीम फत्ते झाल्याची घोषणा केली. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना पंतप्रधानांनी ही घोषणा केल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांनी ते श्रेयाचे राजकारण करत असल्याची टीका केली. 

भारताची अवकाशातील सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून "मिशन शक्ती' या नावाने ही मोहीम आखण्यात आली होती. "लो अर्थ ऑर्बिट'मध्ये फिरणारा, 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह उपग्रहभेदी क्षेपणास्त्राद्वारा (ए-सॅट) केवळ तीन मिनिटांत पाडण्यात आला. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधकांनी ही फत्ते केली. अशा प्रकारे उपग्रह पाडण्याची क्षमता मिळविणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश ठरला आहे. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळाले, हे विशेष. 

उपग्रहभेदी यंत्रणा संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणारे किंवा किंवा भारताची टेहळणी करण्याच्या दुष्ट उद्देशाने वापरील जाणारी विमाने पाडण्याचे उपग्रह तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी त्यांचे उपग्रह पाडण्याचे सामर्थ्य भारताने आज कमावले आहे. "डीआरडीओ'ने आज सकाळी 11 च्या सुमारास हे यश मिळविले. "इस्त्रो'ने 2008 पासून या मोहिमेची तयारी सुरू केली होती व 2012 मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी या मोहिमेला गती दिली. त्याची सफळ निष्पत्ती आज झाली. पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 300 ते 500 किलोमीटर अंतरावर असलेले हेरगिरी करणारे उपग्रह पाडणे आता भारतालाही शक्‍य झाले आहे. भारताने 2012मध्ये "अग्नि' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. त्याचवेळी उपग्रह भेदण्याची क्षमता आपण मिळविली होती. मात्र त्यानंतर त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली गेली नव्हती. 

"लो अर्थ ऑर्बीट' 
पृथ्वीच्या केंद्रापासून साधारणतः दोन हजार किलोमीटर किंवा 1200 मैलांपर्यंतच्या अंतराला "लो अर्थ ऑर्बीट' असे म्हणतात. या कक्षेमध्ये साधारणतः हवामानावर देखरेख ठेवणारे उपग्रह स्थापित केले जातात. मात्र, काही खोडसाळ देश हेरगिरी करणारे उपग्रही अंतराळात पेरून ठेवतात व इतर देशांतील खडानखडा माहिती-छायाचित्रे मिळविण्याचा प्रयत्न करतात. 

यापूर्वी जगाच्या अनेक भागांत अनेक उपग्रहांचे जाळे निर्माण करून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) सारख्या यंत्रणा तयार झाल्या. त्याने स्मार्ट शस्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आदींच्या विकासाला चालना मिळाली. युद्धकाळात हे उपग्रह भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे शत्रूची संपर्कयंत्रणा आणि निर्णयप्रणाली उद्‌ध्वस्त करण्यासाठी प्रथम त्याचे उपग्रह नष्ट करण्यास आधुनिक युद्धात महत्त्व असणार आहे, हे ओळखूनच भारताने गेले दशकभर चाविलेल्या या संशोधन मोहिमेला आज यश मिळाले. 

इतरांच्या चाचण्या 
अमेरिकेने 1958 मध्ये या प्रणालीची चाचणी केली होती. रशियाने 1960 व 1970च्या दशकात याच्या चाचण्या घेतल्या. अमेरिकेने 1985मध्ये एजीएम-135 क्षेपणास्त्र एफ-15 विमानातून डागले होते व त्याद्वारे "सोलविंड पी78-1' हा उपग्रह नष्ट केला होता. चीनने 2007 मध्ये ही प्रणाली विकसित केली होती. त्या चाचणीनंतर अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा उडाला होता. त्याचा मुद्दा त्यावेळी चर्चेत आला होता. चीनच्या चाचणीनंतर अंतराळातील शस्त्रयुद्धाचा मुद्दाही उपस्थित झाला होता. 

केवळ तीन मिनिटांत "मिशन शक्ती' यशस्वी 
"मिशन शक्ती' यशस्वी झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच पंतप्रधानांनी सकाळी "ट्विट' करून राष्ट्राला उद्देशून भाषण करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण देशात उत्सुकता निर्माण झाली होती. निवडणूक असल्याने कोणतीही धोरणात्मक घोषणा करता येणार नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संरक्षणविषयक काही माहिती पंतप्रधानांकडून सांगितली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. यापूर्वी पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला उद्देशून भाषण केले होते. त्या वेळी त्यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. 

"अवकाश संशोधनात भारताने आज आपला झेंडा फडकविला आहे. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राद्वारे अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्यात संशोधनांनी यश मिळविले. केवळ तीन मिनिटांत 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह पाडण्यात आला. जमीन, पाणी, हवा आणि आता त्याबरोबरच अवकाशातही आपण आपले संरक्षण करण्यास सिद्ध झालो आहोत. जमिनीवरून पृथ्वीच्या कक्षेत या क्षेपणास्त्राचा मारा करणे शक्‍य होणार आहे असेही ते म्हणाले,'' अशी घोषणा पंतप्रधानांनी सुरवातीलाच केली. 

"फिरणारा उपग्रह पाडण्यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाची आवश्‍यकता होती. ती "मिशन शक्ती' अंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी पूर्ण केली. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे,'' असे मोदी यांनी सांगितले. 

"भारताने हे तंत्रज्ञान कोणत्याही देशाच्या विरोधात नाही, तर स्वसंरक्षणाचा भाग म्हणून विकसित केले आहे. आम्ही कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर चिथावणीसाठी नाही, तर 130 कोटी जनतेचे संरक्षण आणि विकासाठी करीत आहोत. आमचा हेतू शांतता टिकवून ठेवणे हा आहे. आमच्या यशस्वी प्रयोगामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. सर्व भारतीयांना सुरक्षित ठेवणे हाच आमचा उद्देश आहे,'' असे मोदींनी स्पष्ट केले. 

कोणत्याही देशासाठी उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित व यशस्वी होणे हे फार मोठे यश आहे. यामुळे देशाची सुरक्षा आणखी मजबूत होईल. जर दुसऱ्या देशाने भारताच्या अंतराळ क्षेत्रात घुसखोरी केली, तर त्याला वेळीच रोखण्यासाठी ही अतिशय उपयुक्त प्रणाली ठरणार आहे. - डॉ. डी. के. सारस्वत, डीआरडीओचे माजी प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com