भाजप-सेनेची भांडणे कुत्र्या मांजरासारखी अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

विजयकुमार सोनवणे
रविवार, 27 मे 2018

केंद्रातले मोदी सरकार हे फसवे सरकार आहे. कांग्रेसच्या कालावधीत जे प्रकल्प सुरु झाले, त्याचे उदघाटन करण्याचे काम मोदी करत आहेत. आम्ही प्रकल्प सुरु केले त्याचे श्रेय मोदी घेत आहेत. देशभरातील चित्र असेच आहे. - सुशिलकुमार शिंदे

भाजप  सेनेची भांडण कुत्र्या मांजरासारखी असून कुत्र्या मांजराच्या भांडणा पलीकडे त्यांच्या भांडणाचा उपयोग नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सेनेवर केली आहे. ते सोलापूरात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलत होते. पालघर निवडणुकीतील मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे आगामी  विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजप कोणत्या स्तराला जाऊ शकते याची पालघर निवडणूक ही झलक असल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebo...

चार वर्षे पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारने काही शेर मारला नाही. पेट्रोलचे दर गगनाला का भिडले याचे मोदींनी उत्तर द्यावं असा सवाल उपस्थित करत अशोक चव्हाण यांनी पेट्रोल डिझेल वरूनही मोदींनाही लक्ष्य केलं. पालघरच्या निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेले उद्गार संतापजनक आहेत. त्याचा खुलासा द्यायला त्यांना बारा तास लागले. मला असेम्हणायचे नव्ह्ते, असे ते आता म्हणत आहेत. मात्र त्यांचे वक्तव्य योग्य की अयोग्य हे निवडणूक आयोग ठरवेल. त्याचे स्पष्टीकरण देण्याची मुख्यमंत्र्यांना गरज नाही.फडणवीस मुख्यमंत्री असले तरी निवडणुकीच्यावेळी सर्वजण एकसमान असतात, त्यामुळे आयोग सांगेल तो निर्णय मुख्यमंत्र्यांनाही मान्य करावा लागेल, असेही श्री. चव्हाण म्हणाले. 

सत्ता चालवण्यासाठी खानदानीपणा आणि दृष्टी असायला हवी ती वादळ वावटळीत निवडून येणाऱ्यांना येत नाही. तो खानदानीपणा फक्त काँग्रेसमध्येच आहे अशी टीका करत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपवर याच कार्यक्रमात हल्ला चढवला. राज्याला कर्जबाजारी करणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसाला अस्वस्थ करणाऱ्या सरकारला उखडून टाका असे आवाहनही यावेळी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

त्याचबरोबर, केंद्रातले मोदी सरकार हे फसवे सरकार आहे. कांग्रेसच्या कालावधीत जे प्रकल्प सुरु झाले, त्याचे उदघाटन करण्याचे काम मोदी करत आहेत. आम्ही प्रकल्प सुरु केले त्याचे श्रेय मोदी घेत आहेत. देशभरातील चित्र असेच आहे.  असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

Web Title: ashok chavan criticise on BJP and shivsena