सत्ता आल्यास लव्ह आणि जमिनीचा जिहाद रोखण्यासाठी कायदा; अमित शहांचं आश्वासन

amit shah
amit shah

कमलपूर (आसाम)- आसाममध्ये भाजपची सत्ता आली तर लव्ह आणि जमिनीचा जिहाद रोखण्यासाठी भाजपकडूत तसा कायदा करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथील प्रचारसभेत बोलताना दिले. आसामची संस्कृती भक्कम करण्यासाठी योग्य कायदे, धोरणे राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की जातीयवाद आणि फुटीरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटना आणि व्यक्तींची ओळख पटवून त्यांना नामोहरम करण्यासाठीचे धोरणही अधिनियमित करण्यात येईल. काँग्रेसचा जाहीरनामा केवळ निवडणूक प्रचाराचे एक साधन आहे. मात्र, भाजपचा जाहीरनामा अंमलजावणीसाठी आहे.

‘एआययुडीएफ’चा प्रमुख बद्रुद्दीन अजमलला आसामचा प्रतिनिधी म्हणून सादर केल्यावरूनही गृहमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव आणि माधवदेव, मुघल आक्रमणापासून आसामचे रक्षण करणारे अहोम जनरल लचित बार्फूकान, भारतरत्न प्राप्त आसामी गायक-संगीतकार भूपेन हजारिका, गोपीनाथ बोरडोलोई ही खरी आसामची ओळख आहे. त्यामुळे, आम्ही अजमलला आसामचे प्रतीक बनू देणार नाही. काँग्रेस आणि एआययुडीएफ आसामचे बेकायदेशीर घुसखोरीपासून रक्षण करू शकतात का, असा सवालही शहा यांनी केला. गांधी यांचा पर्यटक असा उल्लेख करत ते निवडणुकांदरम्यान केवळ दोनतीन दिवस आसाममध्ये दिसतात. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी गायब होतात, असेही ते म्हणाले.

आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री तरुण गोगोई एकेकाळी ‘एआययुडीएफ’चे प्रमुख होते. त्यांनीच अजमल कोण आहे, असे विचारले होते, हे राहुल गांधी यांनी ध्यानात ठेवावे. आता काँग्रेसने मतांसाठी याच अजमलबरोबर हातमिळविणी केली आहे, असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

मतदारांपुढे तीन पर्याय

आसामच्या मतदारांपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासकामे व जनसेवा, राहुल गांधी यांचे पर्यटन व अजमलचा घुसखोरीचा अजेंडा या तीन प्रतिमा असल्याचेही शहा यांनी सांगितले. आता मतदारांनीच मोदींचे विकासाचे डबल इंजिन की काँग्रेस-एआययुडीएफचे डबल घुसखोरीच्या इंजिनापैकी एकाची निवड करायची आहे, असेही शहा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com