मुस्लिम व्यक्तीला लावले डुकराचे मांस खायला (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शौकत अली बीफ विक्री करत असल्याचा संशय आल्यानंतर जमावाने त्यांना जबर मारहाण केली व डुकराचे मांस खायला लावले.

नवी दिल्लीः आसाममध्ये बीफ विक्रीच्या संशयातून एका मुस्लिम व्यक्तीला जमावाने मारहाण करून डुकराचे मांस खायला लावल्याची घटना घडली असून, विविध प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आसाममध्ये 7 एप्रिल रोजी बिस्वनाथ चारीअली गावामध्ये ही घटना घडली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटना समोर आली. शौकत अली (वय 68) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शौकत अली बीफ विक्री करत असल्याचा संशय आल्यानंतर जमावाने त्यांना जबर मारहाण केली व डुकराचे मांस खायला लावले. व्हिडिओमध्ये शौकत अली चिखलामध्ये बसले असून, त्यांना जमावाने चारही बाजूने घेरल्याचे दिसत आहे. तुम्ही बीफ विक्री का करता? तुमच्याकडे बीफ विक्रीचा परवाना आहे का? अशी जमावाकडून त्यांची उलटतपासणी सुरु असल्याचे दिसते.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शौकत अली एका छोटा व्यावसायिक असून तो गेल्या 35 वर्षांपासून या भागात एक भोजनालय चालवतो. जमावाने त्यांच्यावर बीफ विक्रीचा आरोप केला. शौकत अली जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आठवडी बाजार भरवणारा कमल थापा बरोबरही जमावाने गैरवर्तन केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मात्र, हा जातीय हिंसाचार नाही.'

Web Title: Assam: Mob thrashes old Muslim man for selling beef and forces him to eat pork