आसाम एनआरसीतून 1 लाख नागरिकांना वगळणार!

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जून 2019

- आसामने एनआरसीतून वगळलेल्या नावांची अतिरिक्त यादी आज (बुधवार) प्रकाशित केली.

- प्रकाशित करण्यात आलेल्या अतिरिक्त यादीमध्ये 1,02,462 व्यक्तींची नावे आहेत. 

- आसाम एनआरसीची अंतिम यादी 31 जुलैला प्रकाशित होईल.

नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा (एनआरसी) चे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या यादीतून जवळपास एक लाख लोकांना वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (बुधवार) आसाम एनआरसीने नवी यादी जाहीर केली असून 31 जुलैला अंतिम मसुदा जाहीर करण्यात येणार आहे. 

आसाम एनआरसीने आज अतिरिक्त यादी प्रकाशित केली असून यामधून 1,02,462 अतिरिक्त व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहेत. या सर्व व्यक्ती एनआरसी यादीच्या अंतिम मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी अपात्र असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची नावे नागरिकांच्या नोंदणीतून वगळण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण आसाम एनआरसीने दिले आहे. 

ज्या लोकांची नावे अतिरिक्त यादीतून वगळण्यात आली आहेत, त्यांना वैयक्तिकरित्या 'लेटर ऑफ इन्फॉर्मेशन' (एलओआय) द्वारे माहिती दिली जाईल. ही सर्व माहिती त्यांच्या निवासी पत्त्यांवर पाठविण्यात येणार आहे. तसेच ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांना 11 जुलैपर्यंत एनआरसी सेवा केंद्रांवर (एनएसके) आपले दावे दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assam NRC published the additional draft exclusion list of 1 lac people

टॅग्स