विधानसभेसाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बैठक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

राज्य विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेसाठी आज दिल्लीत शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक झाली. राज्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने स्थानिक पातळीवर बोलणी कोणाशी करायची, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्‍न आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपचारिक वाटाघाटी सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची आज दिल्लीत बैठक होऊन यावर सहमती झाली. विधानसभा निवडणुकीच्या एकत्रित तयारीला उशीर होऊ नये यासाठी ही बैठक झाली. 

राज्य विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेसाठी आज दिल्लीत शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची बैठक झाली. राज्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने स्थानिक पातळीवर बोलणी कोणाशी करायची, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्‍न आहे. तर, येत्या दोन दिवसांत नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केल्यानंतर औपचारिक चर्चेला सुरवात करता येईल असे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याचे ठरविले असून, त्यांच्या जोडीला चार ते पाच कार्याध्यक्षही नियुक्त केले जाऊ शकतात. 

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसने 174 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 114 जागा लढविल्या होत्या, तर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार जिंकले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून, काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे, तर राष्ट्रवादीचे चार खासदार लोकसभेत आहेत. साहजिकच लोकसभेतील संख्याबळाच्या आधारे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस वाढीव जागा मागण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assembly election in maharashtra Sharad Pawar and Mallikarjun Kharge meeting in delhi